All News

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा निश्चित कराव्यात

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा निश्चित कराव्यात

मुंबई, दि. २२ ऑक्टोबर  : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वैद्यकीय शिक्षण विभागास जिल्हा प्रशासनाने तातडीने जागा निश्चित करुन उपलब्ध करुन द्याव्यात असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख दिले.


रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील आढावा बैठक  मंत्रालयात आयोजित करण्यात आली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खासदार अरविंद सावंत, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा,  वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षणचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. 


श्री. देशमुख म्हणाले की, भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी किमान सलग 20 एकर जागा असणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जागा निश्चित करुन वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करावी. यानंतर वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठीचा आवश्यक असलेला प्रस्ताव (आवश्यक असणारा निधी, मनुष्यबळ, तांत्रिक उपलब्धता) तयार करण्यात यावा, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले. 


मंत्री श्री. सामंत म्हणाले की, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. त्यापैकी रायगड येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबतचे काम सुरु असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा प्रशासनाने किमान 20 एकर जागा निश्चित करुन वैद्यकीय शिक्षण विभागास लवकरात लवकर कळवावे, असे निर्देशही श्री. सामंत यांनी दिले. 


खासदार श्री. राऊत म्हणाले की, कोकणात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती देण्यात यावी.

Advertisement

IBPS Highclonoid Softec Pvt Ltd Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam