All News

डॉ. रामराव बापू महाराजांच्या निधनाने अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी : मंत्री मुंडे

डॉ. रामराव बापू महाराजांच्या निधनाने अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी : मंत्री मुंडे

मुंबई दि. ३१ ऑक्टोबर : संत सेवालाल महाराजांचे वंशज, बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून, मला त्यांचे सान्निध्य, आशीर्वाद लाभले हे माझे भाग्य आहे; अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी डॉ. रामराव बापू महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

डॉ. रामराव बापू महाराज यांना कर्नाटकातील गुलबर्गा विद्यापीठातून डी. लिट. पदवी देऊन सन्मानित केले होते. त्यांनी आयुष्यभर समाजातील अनिष्ट रूढी – परंपरा, बालविवाह, अंधश्रद्धा विरोधात समाज प्रबोधनाच्या माध्यमातून वैचारिक चळवळ उभी केली. केवळ बंजारा समाजच नव्हे तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी सुधारणावादी विचारांनी महाराजांनी संत सेवालाल महाराजांचा वारसा समर्थपणे चालवला.

श्री . मुंडे यांनी डॉ. रामराव बापूंच्या स्मृतींना उजाळा दिला. महाराजांना वाशिम येथील पोहरादेवी तीर्थ क्षेत्रासह अनेक ठिकाणी भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांचे सान्निध्य लाभले हे माझे भाग्यच म्हणावे लागेल असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. नुकतेच मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना धनंजय मुंडे यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली होती.

डॉ. रामराव बापू महाराजांच्या निधनाने अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून, महाराजांचे बंजारा समाज, व्हीजेएनटी आरक्षण लढ्यातील योगदान, त्यांचे अध्यात्मिक व सामाजिक कार्य सदैव स्मरणात राहील तसेच पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd test 4 MahaExam test2