मुंबई, दि. १० ऑगस्ट : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. मागील आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
श्री. तांबे यांनी आरोग्यविषयक लिखाण तसेच व्याख्यानांच्या माध्यमातून निरामय जीवन जगण्यासाठी लोकांना अखेरपर्यंत मार्गदर्शन केले. योगाप्रमाणेच आयुर्वेदाचे व श्रीमतभगवद्गीतेचे ज्ञान संपूर्ण जगापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक होते. तब्बल पाच दशके त्यांनी आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार यांचा प्रचार व प्रसार केला. आयुर्वेद केवळ राज्य किंवा देशभरापुरते मर्यादित न ठेवला त्यांनी जगभरात प्रसार केला आणि त्याचे महत्व पटवून दिले.
बालाजी तांबे यांना लहानपणापासूनच वडिलांकडून आयुर्वेदाची शिकवण मिळाली होती. आयुर्वेदातली आणि अभियांत्रिकीमधली पदवी त्यांनी एकाच वर्षी मिळवली होती. त्यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर संशोधन केलं होतं. त्यांच्या गर्भसंस्कारावरील पुस्तकांना मोठी मागणी होती. या पुस्तकांच्या लाखो प्रती विकल्या गेल्या. इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले आहे.
Copyright © 2023 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.