All News

अजित पवार-फडणवीसांत जुगलबंदी

अजित पवार-फडणवीसांत जुगलबंदी

  • वैधानिक विकास महामंडळाच्या निर्मितीचा प्रश्न; 12 आमदारांच्या नियुक्तीची फोडणी

मुंबई, दि. १ मार्च :  वैधानिक विकास महामंडळाच्या निर्मितीच्या मागणीवरून आज विधानसभेत अजित पवार, सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलाच कलगीतुरा गाजला. सभागृहाबाहेरही त्याचे पडसाद उमटले. पंकजा मुंडे यांनी यावरून अजित पवार यांच्यावर टीका केली.


वैधानिक विकास महामंडळाची मुदत संपल्यानंतरही सरकराने त्याची पुन्हा निर्मिती केली नाही. मराठवाडा आणि विदर्भावर त्यामुळे अन्याय होतो आहे, असा आरोप मुनगंटीवार यांनी केला. विदर्भ आणि मराठवाड्याच्या हिश्शाचा एकही रुपया कमी न करता निधीचे संपूर्ण वाटप करण्यात येईल. वैधानिक विकास महामंडळ अस्तित्वात असल्याचे गृहित धरून निधीवाटपाच्या सूत्रानुसार अर्थसंकल्पात विदर्भ, मराठवाड्याला संपूर्ण निधी दिला जाईल. विदर्भ, मराठवाड्याच्या सर्वंकष विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून विदर्भ व मराठवाडा वैधानिक विकास महामंडळावरील नियुक्त्या लवकरच करण्यात येतील, अशी घोषणा पवार यांनी आज विधानसभेत केली. ही घोषणा करताना पवार यांनी भाजप आणि राज्यपालांना अप्रत्यक्ष चिमटे घेतले. 

विधान परिषदेतील 12 आमदारांची नियुक्ती जाहीर होणेही तितकेच महत्वाचे असल्याचे सांगून या मुद्याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. विधानसभेत उपस्थित एका चर्चेला उत्तर देताना पवार यांनी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळांच्या निर्मितीसाठी राज्याने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवले असल्याची माहितीही देताना केंद्र सरकाच्या दरबारात चेंडू टोलवला. 


मुनगंटीवार यांनी वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? 72 दिवस झाले तरी सरकार का काही करत नाही? असे प्रश्न उपस्थित केले. यावर  पवार यांनी दिलेल्या उत्तरावरुन संतापले आणि आम्ही भिकारी नाही आहोत अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली.  विदर्भ, मराठवड्याची जनताही महाराष्ट्राचा भाग आहे. जनतेच्या वतीने डावपेचात वैधानिक विकास मंडळ अडकता कामा नये, यासाठी हात जोडून विनंती करतो, असे मुनंगटीवार म्हणाले होते. पवार यांनी आश्‍वासन देऊन 72 दिवस झाले आहेत. आश्वासन पूर्ण करणार आहात की नाही एवढेच सांगावे, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली. हे तर मुख्यमंत्र्यांचे आजोळ आहे, नातवाने पेटून उठले पाहिजे. दहा दिवसांचे अधिवेशन एकदम दसनंबरी झाले पाहिजे, असेही ते म्हणाले. 


विकास महामंडळ आम्ही स्थापन करू. याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. बजेटमध्ये तसा निधी देऊ. ज्या दिवशी 12 आमदारांची नावे जाहीर करतील, त्या दिवशी किंवा दुसर्‍या दिवशी आम्ही वैधानिक विकास मंडळ घोषित करू, असे उत्तर पवार यांनी या वेळी दिले. ते बोलत असताना विरोधक गदारोळ घालू लागल्यानंतर तुमचे ऐकले आता माझे ऐकून घ्या म्हणत अजित पवारांनी सुनावले.


आमदार नियुक्तीचा विकासाशी काय संबंध?

मराठवाड्याच्या विकासाचा 12 आमदारांशी काय संबंध आहे? त्या 12 आमदारांपैकी किती मराठवाड्यामधील आहेत? पवार यांनी चुकीचे वक्तव्य केलेले आहे, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली. मराठवाडा हा मागासलेला भाग आहे. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ नियुक्त करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचा या 12 आमदारांशी संबंध लावणे, मला खरेच कळत नाही की, हे राजकीय लोक कोणत्या बुद्धीने काम करत आहेत, असा सवाल त्यांनी केला.

Advertisement

test 4 IBPS Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam