All News

ओबीसी आरक्षणासाठी भाजप नेते रस्त्यांवर

ओबीसी आरक्षणासाठी भाजप नेते रस्त्यांवर

  • राज्यभर चक्का जाम आंदोलन; कोरोनाविषयक नियमांचे सर्रास उल्लंघन

मुंबई, दि. 26 जून :  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. या मुद्द्यावरुन सध्या राजकारण चांगलंच तापले आहे. यावरुन भाजपने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन केले. प्रमुख नेत्यांच्या नेतृत्त्वात विविध जिल्ह्यांत चक्काजाम आणि जेलभरो आंदोलन करण्यात आले. मुंबईत आशिष शेलार, खासदार मनोज कोटक तर पुण्यात पंकजा मुंडे, नागपुरात देवेंद्र फडणवीस आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनाच्या वेळी मुखपट्टी, सामाजिक अंतर भान आदी नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात आले.

मुलुंड इथल्या आनंदनगर टोलनाक्यावर भाजप नेते आशिष शेलार, खासदार मनोज कोटक यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम करण्यात आले. यानंतर पोलिसांनी आशिष शेलार यांच्यासह सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली. पुण्यात माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात चक्काजाम आंदोलन झाले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं आंदोलन रद्द झाली, अशी टीका त्यांनी केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

गोंदियात ओबीसी आरक्षणाच्या प्रश्‍नावर भाजपने सडक अर्जुनीतून भव्य बैलगाडी मोर्चा काढून कोहमारा इथल्या मुंबई-हावडा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. चंद्रपुरात ओबीसी आरक्षणाच्या प्रश्‍नावर भाजपने आज ठिकठिकाणी चक्काजाम केले. चंद्रपूर-नागपूर आणि चंद्रपूर-यवतमाळ मार्गावर पडोली चौकात हजारो भाजप कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे पडोली चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हंसराज अहिर यांनी वरोरा येथे तर चिमूर येथे भाजप आमदार बंटी भांगडिया यांनी चक्काजाम केला. ग्रामीण भागातून ओबीसी कार्यकर्त्यानी आंदोलनाला मोठ्या संख्येने हजेरी लावली.

भिवंडी शहरातील वर्दळीच्या कल्याण नाका परिसरात भाजप शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप ओबीसी विभागाने चक्का जाम आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी स्त्री पुरुष कार्यकर्त्यानी रस्त्यावर बसकण मारल्याने या परिसरातील वाहतूक काही काळ खोळंबली होती. मुंबई-नाशिक महामार्गावरील राजनोली नाका या ठिकाणी खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने मुंबई-नाशिक महामार्गावर दोन ते तीन किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी वर्ध्याच्या बजाज चौकात भाजपच्या वतीने आज ’रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. ओबीसी आरक्षणासाठी परभणी जिल्ह्यात आज भाजपकडून तब्बल 16 ठिकाणी चक्का जाम आंदोलन झाले. परभणी शहरातील महाराणा प्रताप चौकात महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वात तर जिंतुर शहरातील अण्णा भाऊ साठे चोकात भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. जळगाव शहरातही खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वात मुंबई-नागपूर महामार्गावर आकाशवाणी चौकात आंदोलन करण्यात आले.

धुळे जिल्हा भाजपच्या वतीने चाळीसगाव चौफुली येथे ’रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने हे ’रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.


बाराबलुतेदारांसह पडळकर यांचे चक्काजाम

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून आघाडी सरकारला जाग आणण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आज सांगलीतील पुष्पराज चौक येथे भाजपने चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनात बहुरुपी, गोंधळी, पोतराज, वाघ्या मुरळी, उवरी-गडशी, सुतार, कुंभार, लोहार, वासुदेव, गुरव, हेळवी, डोंबारी, गोसावी यासह अनेक अठरापगड जातीचे बाराबलुतेदार आपापली वेशभूषा परिधान करुन आंदोलनात सहभागी झाले होते. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 


स्वतंत्र आंदोलनाऐवजी एकत्र या

एकीकडे भाजप आंदोलन करीत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीने लोणावळा येथे ओबीसी परिषद घेण्यात आली. भाजप आणि सत्ताधार्‍यांत आरोप-प्रत्यारोप होत असताना दुसरीकडे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मात्र आरक्षणाच्या प्रश्‍नावर पक्षीय राजकारण, मोर्चे काढण्याऐवजी एकत्र येण्याचे आवाहन केले.

Advertisement

IBPS MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd test2