All News

मुख्यमंत्री-राज्यपालांतला वाद सुरूच

मुख्यमंत्री-राज्यपालांतला वाद सुरूच

कोलकात्ता, दि. १४  मे : पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन आता जवळपास 12 दिवस लोटले आहेत; मात्र राज्यपाल जगदीप धनखार आणि पश्‍चिम बंगालमध्ये पुन्हा सत्तेत आलेले ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालचे सरकार यांच्यातला वाद काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. धनखार यांनी पश्‍चिम बंगालमधील निवडणुकांदरम्यान हिंसाचार झालेल्या कूचबिहार भागाला भेट दिली. त्यानंतर आज राज्यपालांनी पश्‍चिम बंगालमध्ये निर्माण झालेली परिस्थिती सांगताना राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्यातील नागरिक पोलिसांकडे जायला घाबरत आहेत. पोलिस तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घाबरत आहेत. मी पोलिसांना परत येण्याचे आवाहन केले आहे. मी त्यांना सांगितले आहे, की त्यांच्यासाठी मी छातीवर गोळी खाईन, असे धनखार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, या वेळी धनखार यांनी मुख्यमंत्र्यांनी वाद टाळायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. राज्यातल्या परिस्थितीवर मी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक दृष्टिकोनातून बोलणात आहे. त्यांना जनतेचा कौल मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांनी थेट वाद टाळायला हवा, असे ते म्हणाले आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने सर्व अंदाज खोटे ठरवत तब्बल 231 जागा जिंकल्या, तर भाजपला 77 जागांवर समाधान मानावे लागले. दहा मे रोजी बॅनर्जी यांच्यासोबत 43 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल आणि बॅनर्जी यांच्यातील वितुष्ट समोर आले होते.

आता पुन्हा एकदा राज्यपालांच्या दौर्‍यादरम्यान हा वाद समोर येऊ लागला आहे. कूचबिहार या ठिकाणी बोलताना धनखार यांनी बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. ’’मी हिंसाचार झालेल्या भागाला भेट देणार समजल्यावर मला राज्य सरकारच्या परवानगीशिवाय भेट देता येणार नाही असे सांगण्यात आले; पण मी भेट देणारच असे कळवले आणि निघालो,’’ असे ते म्हणाले. राज्यातील निवडणुकीनंतर अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले. त्यामुळे आपल्याला धक्का बसला. त्यामुळे जनहितार्थ आपण हिंसाचाराने बाधित असलेल्या अनेक भागांचा दौरा करण्याचा निर्णय घेतला. देशासमोर सध्या कोरोनाचे संकट आहे, तर राज्यासमोर कोरोनासह निवडणुकीनंतरचा हिंसचार अशी दोन आव्हाने आहेत, असे राज्यपालांनी सीतालकुची येथे बोलताना म्हटले होते.

Advertisement

MahaExam test 4 test2 Highclonoid Softec Pvt Ltd