All News

नितीशकुमार भाजपची साथ सोडणार?

नितीशकुमार भाजपची साथ सोडणार?

  • अरुणाचल प्रदेशातील घटना भोवणार; राजकीय घडामोडींना वेग

पाटणा, दि. १ डिसेंबर :  बिहारमध्ये नव्या वर्षात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्याचे संकेत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी दिले आहेत. नितीशकुमार यांनी पुन्हा महागठबंधनमध्ये सामील करून घेण्याबद्दल पक्षाचे नेते विचार करतील, असे राबडीदेवी म्हणाल्या होत्या.  


अरुणाचल प्रदेशात भारतीय जनता पक्षाने नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे सातपैकी सहा आमदार फोडले. बिहारमध्ये मित्रपक्ष असलेल्या भाजपने दिलेला धक्का नितीशकुमार यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यानंतर रष्ट्री जनता दलाने नितीशकुमार यांना पुन्हा महागठबंधनमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भारतीय जनता पक्ष बिहारमध्ये अरुणाचल प्रदेशची पुनरावृत्ती करू शकतो, असे राबडीदेवी म्हणाल्या. संयुक्त जनता दलाला सोबत घेऊन राज्यात सत्तांतर घडवण्याचा राष्ट्रीय जनता दलाचा प्रयत्न आहे. त्यासाठी खुद्द लालूप्रसाद यादव कामाला लागले आहेत. नितीशकुमार यांना लक्ष्य करू नका, अशा सूचना त्यांनी पक्षाच्या नेत्यांना केल्या आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने केलेले राजकारण नितीशकुमार यांना पटलेले नाही. नितीशकुमार यांना महागठबंधनमध्ये आणण्यासाठी काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीमधील काही नेतेदेखील कामाला लागल्याची चर्चा आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही मदत घेतली जाण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने केलेले फोडाफोडीचे राजकारण ही राष्ट्रीय जनता दलासाठी संधी आहे आणि नितीशकुमार यांच्यावर टीका करून ती गमावू नका, असा सल्ला लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दिला आहे. 


चार दिवसांपूर्वी संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत पक्षाची धुरा खासदार रामचंद्र प्रसाद सिंह यांच्याकडे सोपवल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आणखी एक मोठे विधान केले. त्यामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ माजली आणि नितीशकुमार आता नेमके काय करणार, याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. मला मुख्यमंत्रिपद नको. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मुख्यमंत्री कोणाला करायचे ते ठरवावे, असे नितीशकुमार यांनी म्हटले.


मुख्यमंत्रिपदासाठी दबाव

पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत नितीशकुमार यांनी अध्यक्षपदासाठी रामचंद्र प्रसाद सिंह यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. तो मंजूरदेखील झाला. त्यामुळे आता रामचंद्र प्रसाद सिंह संयुक्त जनता दलाचे नेतृत्त्व करतील. पक्षाची धुरा सिंह यांच्याकडे सोपवल्यानंतर नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदावरही भाष्य केले. ’मी मुख्यमंत्रिपद स्वीकारावे, यासाठी बराच आग्रह करण्यात आला. माझ्यावर बराच दबाव होता. त्यामुळे मी मुख्यमंत्रिपद स्वीकारले; पण मला खुर्चीचा मोह नाही,’ असे नितीशकुमार म्हणाले.

Advertisement

test 4 Highclonoid Softec Pvt Ltd IBPS Highclonoid Softec Pvt Ltd