All News

टाळेबंदीबाबत दोन दिवसांत निर्णय

टाळेबंदीबाबत दोन दिवसांत निर्णय

  • उद्धव ठाकरे यांचे संकेत; महाराष्ट्रातील स्थितीबाबत केंद्रालाही चिंता

मुंबई, नवी दिल्ली, दि. ११ मार्च : देशात एकीकडे कोरोनावरील लसीकरण मोहीम वेगात सुरू असताना दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहेत. खासकरून महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा कडक टाळेबंदीचा इशारा दिला आहे. येत्या एक दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


केंद्र सरकारने राज्याला कोरोना संसर्गाला सहजतेने घेऊ नका, असे बजावले आहे. देशात आढळलेल्या एकूण बाधितांत महाराष्ट्रातील बाधितांचे प्रमाण साठ टक्के आहे. देशात सर्वाधिक रुग्ण़ असलेल्या दहा जिल्ह्यांत महाराष्ट्रातील आठ जिल्हे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारनेही ही बाब गांभीर्याने घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोना लस घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी जिथे कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण जास्त आहे, तिथे कडक टाळेबंदी लागू करण्याचा इशारा दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वेगवेगळ्या शहरांमधील निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. काही ठिकाणी आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी शनिवार रविवारी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत; मात्र लवकरच टाळेबंदीसंदर्भात मोठा निर्णय जाहीर होईल, अशी शक्यता ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर व्यक्त केली जात आहे.


महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाचे नवीन रुग्ण अतिशय झपाट्याने वाढत असल्याने केंद्र सरकार अतिशय चिंतेत आहे. देशाला कोरोनामुक्त करायचे असेल सर्व जनतेने पूर्ण काळजी घेण्याची गरज आहे, असे नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल म्हणाले. एका पत्रकार परिषदेत पॉल यांनी देशातील कोरोना संसर्गाच्या स्थितीसंदर्भात माहिती दिली. महाराष्ट्राबाबत आम्ही फार चिंतेत आहोत. महाराष्ट्रात वाढत असलेला प्रादुर्भाव हा गंभीर प्रश्‍न आहे. कोरोना संसर्ग सहजतेने घेऊ नका. तसेच कोरोनामुक्त व्हायचे असेल, तर कोरोनासंबंधी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावच लागेल, असे पॉल म्हणाले. करोनाच्या नवीन प्रकारामुळे हा संसर्ग वाढत असल्याचे कुठेही आढळून आलेले नाही. हा प्रादुर्भाव चाचण्यांमध्ये झालेली घट, बाधित रुग्णांच्या संपर्कात येणार्‍यांचा आणि त्यांचा शोध घेण्यात येणार्‍या उणिवामुळे कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे, असे आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले.


महाराष्ट्रात एक लाख अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

देशात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या एक लाखांवर गेली आहे. मध्य प्रदेश, हरयाणा आणि गुजरातमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. आम्ही या राज्यांसोबत बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहे. या सर्व राज्यांनी आता कंबर कसून मैदानात उतरावे, असे आम्ही सांगितले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

Advertisement

IBPS test2 IBPS MahaExam