नवी दिल्ली, दि. ३ मे : देशातील कोरोनाच्या दुसर्या लाटेने हाहाकार माजवलेला आहे. रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत असून, ते उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. कोरोनाच्या या संकटानंतरही देशाला डॉक्टर आणि परिचारिकांच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो, असाही अंदाज वर्तवला जात आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैद्यकीय कर्मचार्यांची उपलब्धता वाढविण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे.
वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा कमीत कमी चार महिने पुढे ढकलली जावी. तसेच कोविड ड्युटीचे शंभर दिवस पूर्ण करणार्या वैद्यकीय कर्मचार्यांना नियमित सरकारी भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे. मोदी म्हणाले, की कोविड रुग्णांच्या सेवेत शंभर दिवस काम पूर्ण करणारे वैद्यकीय कर्मचार्यांना पंतप्रधानांचा प्रतिष्ठित कोविड राष्ट्रीय सेवा पुरस्कार देण्यात येईल. याद्वारे त्यांना शासकीय भरतीत प्राधान्य दिले जाईल. नुकतेच हृदयरोग सर्जन डॉ. देवी शेट्टी यांचे एक विधान समोर आले होते. ते म्हणाले, की ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे पुढचे मोठे संकट हे डॉक्टर आणि परिचारिकांवर येणार असून, त्यांची कमतरता भासू शकते. या महिन्यात कोरोना जास्त वाढणार आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांना डॉक्टर आणि परिचारिकांची भेट घेणे कठीण होईल.
वरिष्ठ डॉक्टर आणि परिचारिका यांच्या देखरेखीखाली पूर्णवेळ कोरोना नर्सिंगमध्ये परिचारिका वापरल्या जाऊ शकतात.
ड्युटीवर असणार्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने लस दिली जाईल. या व्यतिरिक्त कोरोना रुग्णांच्या सेवेत असलेल्यांना आरोग्य कर्मचार्यांप्रमाणेच केंद्राच्या विमा योजनेत समाविष्ट केले जाईल. पीजी विद्यार्थ्यांच्या नवीन बॅच जोपर्यंत तयार होत नाही, तोपर्यंत अंतिम वर्षाच्या पीजी विद्यार्थ्यांना सेवेत वापरले जाऊ शकते.
Copyright © 2023 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.