All News

कोरोना विषाणूतील बदल साधारण

कोरोना विषाणूतील बदल साधारण

नवी दिल्ली, दि. २७ डिसेंबर :  ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्वरूपामुळे (स्ट्रेन) घाबरण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दांत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी नागरिकांना दिलासा दिला.


एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणतात, की जगभरात तयार होणारी कोरोना प्रतिबंधक लस विषाणूच्या नव्या स्वरूपावरदेखील प्रभावी ठरणारी आहे. नऊ-दहा  महिन्यांतील कोरोना विषाणूतील बदल साधारण आहे. बदल लक्षात घेऊनच लस तयार केली जाते. तज्ज्ञांनुसार, विविध घटकांपासून लस तयार होत आहे. भारतातील लस प्रोटीनआधारित आहे. ही लस ४ ते ६ आठवड्यांत अपडेट करता येऊ शकते. त्यामुळे विषाणूच्या नव्या स्वरूपाला घाबरण्याची गरज नाही.


आयसीएमआरचे माजी शास्त्रज्ञ प्रा.रमण गंगाखेडकर यांच्यानुसार, भारतात जिनोम सिक्वेन्सिंग जास्त प्रमाणात झालेली नाही. याद्वारे विषाणूतील बदल जाणता येतो. आतापर्यंत झालेल्या सिक्वेन्सिंगनुसार, भारतात सुरुवातीच्या टप्प्यातील विषाणूचे स्वरूप चीनमधील वुहानप्रमाणे होते. नंतर इटली व इतर युरोपीय देशांतील स्वरूपही आढळले. येथे आधीपासूनच विषाणूची अनेक स्वरूपे आहेत. नव्या स्वरूपावर युरोपात झालेल्या संशोधनानुसार, हा विषाणू वेगाने पसरतो; मात्र त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी आहे. ब्रिटनमध्ये स्ट्रेननंतर दिवसाला १४ हजारांहून २९ हजार रुग्ण आढळत आहेत, तर ४०० ते ५०० मृत्यू झाले आहेत. 


जिनोम सिक्वेन्सिंगचा रिपोर्ट साधारणत: ३६ तासांत मिळतो; मात्र ब्रिटनमधून आलेल्या पॉझिटिव्ह व्यक्तींचा रिपोर्ट तीन दिवसांनंतरही मिळालेला नाही. भारत बायोटेक कंपनीकडून तयार होणाऱ्या लसीच्या वैद्यकीय चाचणीची जबाबदारी सांभाळणारे कम्युनिटी मेडिसिनचे डॉ. संजय रॉय म्हणाले, की विषाणूत नेहमी बदल होत असतो; मात्र मूळ प्रवृत्तीत बदल होत नाही. यामु‌ळे आतापर्यंत समोर आलेल्या सर्वच लसी प्रभावी ठरतील. विषाणूतील बदल लक्षात घेऊनच लस तयार केली जात आहे. लसीत अनेक प्रोटीन असतात.


सर्व देशांकडून नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. नवीन स्वरूपातील विषाणू वेगाने पसरत असल्यामुळे भीती पसरली आहे. विषाणूतज्ज्ञ प्रा. शाहिद जमील म्हणाले, की नवीन स्वरूपातील विषाणू मूळ विषाणूपेक्षा फार काही वेगळा नाही. हा लसीने नष्ट करता येऊ शकतो.

Advertisement

IBPS MahaExam test 4 test2