All News

एखाद्याला लटकवायचे आणि आयुष्यात उठवायचे

एखाद्याला लटकवायचे आणि आयुष्यात उठवायचे

  • मुख्यमंत्री ठाकरे यांचा राठोड प्रकरणी विरोधकांवर निशाणा; गलिच्छ राजकारण

मुंबई, दि. १ मार्च : संजय राठोड यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे. विरोधकांनी गलिच्छ राजकारण सुरू केले आहे. तपास झाला पाहिजे. तो निष्पक्षपातीच असला पाहिजे; पण एखाद्याला लटकवायचे आणि आयुष्यातून उठवायचे असा तपास होता कामा नये, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.


राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ठाकरे यांनी अधिवेशनाबाबतची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी राठोड यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले. तुम्ही म्हणाल तसा तपास होणार नाही. तुम्ही तपासाला दिशा देऊ शकत नाही आणि तपासही भरकटवू शकत नाही, असा हल्लाही त्यांनी विरोधकांवर चढवला. राठोड प्रकरणाचा तपास नीट होऊ द्या. चौकशी होऊ द्या. केवळ आदळआपट करू नका. आज तुम्ही ज्या तपास यंत्रणेवर अविश्‍वास दाखवत आहात तीच यंत्रणा पूर्वीही काम करीत होती. तुमच्याही काळात चांदा ते बांदापर्यंत ज्या घटना घडल्या. त्याच पोलिसांवर तुम्ही अविश्वास दाखवत असाल तर आश्‍चर्यच आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. 


सरकार चालवताना आमची न्यायाने वागण्याची जबाबदारी असते. प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात. तुम्ही म्हणत असाल, की इतके दिवस का लावले? गुन्हा दाखल करुन मोकळे होणे याला न्याय म्हणत नाहीत. ज्या वेळी घटना कळली. त्या वेळीच तपासाचा निर्णय झाला. पोलिसांना तसा आदेश दिला. तपासातून सत्य बाहेर येईल, तेव्हा कुणालाही पाठीशी घालणार नाही. दोषीला कठोर शिक्षा देऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. तपास व्यवस्थित होऊ द्या. तुमच्या काळातही हीच तपास यंत्रणा होती. ज्या पोलिसांवर तुम्ही अविश्वास दाखवत आहात. तुमच्या काळातही त्यांनीच तपास केला होता. मग, आता अविश्वास कसा दाखवता? पोलिस हा सरकारचा कणा असतो, अशावेळी त्यांच्यावर अविश्वास दाखवणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.


अहवाल आल्यानंतरच निर्णय

विरोधी पक्षनेते हे पूर्वी मुख्यमंत्री होते. त्यामुळे गुन्हा कधी दाखल करतात हे त्यांनाही माहीत आहे. आधी तपासाचा प्राथमिक अहवाल येऊ द्या. अहवाल आल्यानंतर त्यात काही असेल तर त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.


Advertisement

IBPS Highclonoid Softec Pvt Ltd IBPS test2