मुंबई, दि. १३ जून : राज्यातील गड किल्ल्यांचे पावित्र्य टिकवून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्यासंदर्भात आता पावले टाकण्यात येत असून राज्यातील दुर्गप्रेमी, दुर्ग संवर्धक, गिर्यारोहक यांनी यासंदर्भातील आपल्या सूचना व प्रस्ताव मुख्यमंत्री सचिवालयातील संकल्प कक्षास त्वरित पाठवाव्यात असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. किल्ल्यांच्या संवर्धनातील अडचणी दूर करण्यासाठी पुढे यावे व कामाला सुरुवात करावी असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील २५० दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला व त्यांच्या सूचना ऐकल्या. या बैठकीचे संचालन आदेश बांदेकर, मिलिंद गुणाजी यांनी केले तर अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, गिरीश टकले या प्रसिद्ध गिर्यारोहक व दुर्गप्रेमींनी आपले विचार सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मांडले.
ईमेलवर सूचना पाठवा
दुर्गप्रेमींना दुर्ग संवर्धनाच्या दृष्टीने काही सूचना करावयाच्या असतील तर त्यांनी त्या cmsankalpkaksha@maharashtra.gov.in या मुख्यमंत्री सचिवालयाच्या संकल्प कक्षाला पाठविण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ते म्हणाले की, दुर्ग संवर्धनात आपण आजपर्यंत केवळ अडीअडचणींचा पाढा वाचत होतो पण आता तसे होणार नाही. या अडचणींवर मार्ग काढून पुढे कसे जायचे ते या क्षेत्रातील तज्ञ मंडळीनी एकत्र बसून ठरवावे व किल्ल्यांच्या संवर्धनाचा सर्वंकष आराखडा तयार करावा, राज्य शासन यामध्ये पूर्ण सहकार्य करेल.
गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपा
गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपत, त्याच्या ऐतिहासिक आणि पुरातत्त्व वारशाला कोणताही धक्का न लावता आपल्याला हे काम करावयाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी परत एकदा स्पष्ट केले.गड किल्ल्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्याचा आपला विचार असून हळूहळू यात इतर किल्ल्यांचाही समावेश करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात तोरणा, शिवनेरी, राजगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुधागड या सहा किल्ल्यांचे संवर्धन करण्याचे नियोजन आहे. दुर्गप्रेमी आणि अभ्यासकांचा सहभाग असलेली एक मध्यवर्ती समिती स्थापन करून सर्वांच्या सूचनांचा विचाराने आराखडा तयार करायला लागा असेही मुख्यमंत्री म्हणाले. गड किल्ल्यांचे संवर्धन करणार म्हणजे नक्की काय करणार आणि त्यांचे पावित्र्य अबाधित ठेवून ते कसे करायचे त्याचा पहिले सविस्तर विचार करा. जगभरात शिवरायांच्या या गडकिल्ल्यांची महती पोहोचेल यासाठी उत्तमोत्तम आणि दर्जेदार छायाचित्रे, ड्रोनसारख्या साधनांचा उपयोग करून केलेल्या व्हिडिओ क्लिप्स विविध माध्यमांतून जगभर पोहोचेल असे पाहिले पाहिजे. गड किल्यांच्या पायथ्याशी परिसरात त्या किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती देणारे केंद्र किंवा संग्रहालय उभारणे, केंद्र व राज्याकडील किल्ल्यांची वर्गवारीनुसार संवर्धनाचे नियोजन करणे, किल्यांच्या परिसरातील जैवविविधता, निसर्ग, प्राणी- पक्षी यांचीदेखील जपणूक तितकीच महत्त्वाची असून त्याविषयीही पर्यटक आणि संशोधक यांना आकर्षक स्वरूपात उपयुक्त माहिती मिळणे गरजेचे आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी दुर्गप्रेमींनी आपल्या सूचना मांडताना दुर्गांचे राज्य सरकारने अधिग्रहण करावे. पर्यटन, पुरातत्व, वन विभाग यांच्यात अधिक समन्वय असावा, दुर्ग संवर्धन खाते सुरु करावे, दुर्गांसाठी सहाय्यता निधी सुरु करावा अशा अनेक सूचना केल्या. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2023 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.