All News

भुयारी मार्गाचे काम चिनी कंपनीला

भुयारी मार्गाचे काम चिनी कंपनीला

  • सरकारला स्वतःच्याच घोषणेचा पडला विसर

नवी दिल्ली, दि. ४ जानेवारी :  पूर्व लडाखमध्ये भारताविरोधात कुरघोड्या करणा-या चिनी कंपन्यांना देण्यात आलेली अनेक कंत्राटे गेल्या काही महिन्यांत रद्द करण्यात आली. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत हीच कंत्राटे भारतीय कंपन्यांना देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या; मात्र आता दिल्ली-मीरत आरआरटीएस प्रकल्पाच्या अंतर्गत येणा-या न्यू अशोक नगर ते साहिबाबादपर्यंतच्या 5.6 किलोमीटर भुयारी मार्गाच्या कामाचे कंत्राट चीनच्या शांघाय टनल इंजिनीयरिंग कंपनी लिमिटेडला देण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित स्वदेश जागरण मंचने याला विरोध करत कंत्राट रद्द करण्याची मागणी केली आहे. 


प्रादेशिक रेल्वे परिवहन प्रणालीला (आरआरटीएस) कार्यान्वित करणार्‍या एनसीआरटीसीने चिनी कंपनीला देण्यात आलेल्या कंत्राटाबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. निर्धारित प्रक्रिया आणि अटी, शर्तींनुसार कंत्राट देण्यात आल्याचे एनसीआरटीसीने सांगितले; मात्र एका बाजूला चीनकडून सीमेवर कुरापती सुरू असताना त्यांच्या कंपन्यांना कंत्राटे कशासाठी असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित स्वदेशी जागरण मंचाने हा विषय लावून धरला आहे. त्यामुळे सरकार अडचणीत आले आहे. 


स्वदेशी जागरण मंचाने मोदी सरकारला त्यांच्याच आत्मनिर्भर भारत घोषणेची आठवण करून दिली आहे. ’आत्मनिर्भर भारत योजनेला यशस्वी करायचे असल्यास सरकारने महत्त्वाच्या योजना, प्रकल्पांसाठी बोली लावण्यापासून चिनी कंपन्यांना रोखायला हवे. या प्रकल्पांमध्ये बोली लावण्याचा अधिकार चिनी कंपन्यांना द्यायला नको’, अशी भूमिका स्वदेशी जागरण मंचाने घेतली आहे. मंचाचे राष्ट्रीय सहसंयोजक अश्‍वनी महाजन यांनी यासंदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधत चिनी कंपनीला देण्यात आलेले कंत्राट रद्द करण्याची मागणी केली आहे.


सरकारची भूमिका काय?

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, निश्‍चित करण्यात आलेल्या प्रक्रिया आणि अटींनुसारच हे कंत्राट देण्यात आले. लिलाव प्रक्रियेत भारतीय कंपन्यांना पूर्ण संधी देण्यात आली होती. नऊ नोव्हेंबर 2019 रोजी न्यू अशोक नगर ते दिल्ली गाजियाबाद मीरत आरआरटीएस कॉरिडॉरच्या साहिबाबादपर्यंत भुयार तयार करण्यासाठी बोली लावण्यास सांगितले होते. यासाठी पाच कंपन्यांनी निविदा भरली होती. त्यातली चिनी कंपनीची निविदा इतरांपेक्षा कमी रकमेची होती.

Advertisement

MahaExam IBPS Highclonoid Softec Pvt Ltd test2