All News

राजस्थानात भाजपत, तर रायबरेलीत काँग्रेसमध्ये बंड

राजस्थानात भाजपत, तर रायबरेलीत काँग्रेसमध्ये बंड

  • वसुंधराराजे समर्थकांचा स्वतंत्र गट; सोनियांच्या बालेकिल्ल्यात 35 नेत्यांचे राजीनामे

जयपूर / रायबरेली, दि. ९ जानेवारी :  राजस्थानात एकीकडे काँग्रेसमधील कलह वाढत असताना आता भारतीय जनता पक्षातील गटबाजी आणि असंतोष चव्हाट्यावर आला आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांना बाजूला सारल्यानंतर नाराज असलेल्या समर्थकांनी थेट वेगळा गट स्थापन केली आहे. वसुंधराराजे समर्थक राजस्थान मंच असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांचा गड मानल्या जाणा-या रायबरेलीतील 35 नेत्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. 


वसुंधरा राजे समर्थकांनी राजस्थानमधील प्रत्येक जिल्ह्यात अध्यक्ष नेमण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय युवा संघटना आणि महिला संघटनांची स्थापना केली जात आहे. भाजपमध्ये अशा प्रकारे वेगळा गट स्थापन करण्याचा प्रकार प्रथमच घडत आहे. वसुंधरा समर्थक मंचाचे प्रदेशाध्यक्ष विजय भारद्वाज यांनी सांगितले, की 2003 पासून वसुंधराराजे यांच्यासोबत काम करत आहे. त्यांच्यामुळेच जनता दलाला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये राज्य कार्यकारिणीचा सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. भाजपच्या आमंत्रित कार्यकारिणीचाही सदस्य राहिलो आहे. याशिवाय विधी प्रकोष्ठ अध्यक्ष म्हणून काम केले आहे. आता वसुंधराराजे यांचे स्थान मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 


दरम्यान, राजस्थानचे भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. वसुंधराराजे यांच्या समर्थकांनी स्थापन केलेल्या गटाविषयी राज्यातील सर्व नेते आणि केंद्रीय नेतृत्वाला माहिती आहे. भाजप हा व्यक्ती आधारित पक्ष नसून, तो संघटनेवर आधारलेला पक्ष आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून सूचना येईल, तसा निर्णय घेतला जाईल, असे पुनिया यांनी सांगितले. 


काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. उत्तर प्रदेशातील आगामी पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा धक्का मानला जात आहे. काँग्रेस पक्षातील 35 पदाधिकार्‍यांनी आपला राजीनामा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे. पक्षात आता जुन्या सहका-यांना डावलले जात आहे. पक्षातील जुन्या पदाधिकारी तसेच नेत्यांची दखलही घेतली जात नाही, असा आरोप करण्यात आला आहे. रायबरेली हा सोनिया गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांमुळे रायबरेलीमधील पक्षाची अवस्था अमेठीसारखी होईल, असा इशारा या पदाधिका-यांनी दिला आहे. 


दरम्यान, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी वृत्त फेटाळत त्यांच्याकडे कोणतेही राजीनामे आलेले नाहीत, असे सांगितले. काही दिवसांपूर्वी काँग्रेस जिल्हाधिका-यांनी एक नवीन कार्यकारिणी स्थापन केली होती. यानंतर पक्षातील नेते आणि पदाधिका-यांचा नव्या कार्यकारिणीला विरोध करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षासाठी अनेक जण कार्यरत आहेत. पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नव्या कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवली जात आहे, तर दुसरीकडे, 30 वर्षांपासून पक्षासाठी कार्यरत असणा-यांना बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. जिल्हाध्यक्ष स्वतःच्या चुका आणि कमतरता झाकण्याचा प्रयत्न करत आहेत, अस दावा प्रदेश सचिव आणि काँग्रेस समितीचे सदस्य शिवकुमार पांडे यांनी या वेळी केला.

Advertisement

MahaExam test 4 Highclonoid Softec Pvt Ltd IBPS