All News

खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेस नेत्यांकडून शोक अनावर

खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेस नेत्यांकडून शोक अनावर

पुणे, दि. १६  मे :  कोरोनामुळे काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे.  राजीव सातव यांचे पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. काही दिवसांच्या उपचारानंतर सातव यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला, त्यानंतर मात्र त्यांना न्युमोनियाची पुन्हा लागण झाली होती. त्यांच्या निधनानंतर काँग्रेस नेत्यांकडून शोक अनावर झाला आहे. 


प्रतिभाशाली उमदे नेतृत्व हरपले!

जिल्हा पातळीपासून राजकीय प्रवास सुरू करून विलक्षण जिद्द व कर्तबगारीच्या बळावर अतिशय कमी वेळेत राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण करणारे खा.सातव यांच्याबद्दल संपूर्ण देशात कुतूहल होते. महाराष्ट्रासाठी ते एक अभिमान होते. पुढील काळात देश व काँग्रेस पक्षासाठी त्यांच्याकडून मोठे योगदान अपेक्षित केले जात होते. खा.राजीव सातव यांचे निधन काँग्रेस पक्षासाठी मोठी हानी आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण देशातील त्यांचा मित्र परिवार आणि चाहत्यांच्या मनात त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व सातव कुटुंबियांना हे अपरिमित दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.


काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा व उज्ज्वल भविष्य असलेला समर्पित नेता गमावला!

खासदार राजीव सातव यांचे काम मी जवळून पाहिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. पंचायत समिती सदस्य ते खासदार प्रत्येक जबाबदारी पार पाडत असताना गरीब, कष्टकरी जनता, तरूण व  शेतकऱ्यांचे प्रश्न ते अत्यंत तळमळीने मांडत असत. आपल्या कामाच्या ताकदीवर ते कमी वयात देश पातळीवरच्या राजकारणात पोहोचले. आमदार, खासदार म्हणून त्यांनी आपल्या कामाची वेगळी ओळख निर्माण केली होती. सामाजिक, राजकीय प्रश्नांची त्यांना उत्तम जाण होती. विविध विषयांचा अभ्यास, संघटन कौशल्य, अभ्यासू, मनमिळावू, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव होता.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष व त्यानंतर अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी तरुणांचे मोठे संघटन उभे केले. खासदार म्हणून संसदेत काँग्रेस पक्षाची भूमिका ते भक्कमपणे मांडत असत. कृषी कायद्याला तीव्र विरोध करत राज्यसभेत त्यांनी पक्षाची बाजू समर्थपणे मांडली. त्यांना तीनवेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. संविधान, लोकशाही व काँग्रेस विचारांसाठी संघर्ष करण्याची त्यांची तयारी असायची. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर काँग्रेस पक्षाची सर्वोच्च समिती असणाऱ्‍या काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्यपदी त्यांची निवड करण्यात आली होती. राजीव सातव यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाची व काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. आम्ही सर्व या कठीण प्रसंगी सातव कुटुंबियांच्या सोबत आहोत. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, अशी ईश्वराकडे मी प्रार्थना करतो. खासदार राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून, राजीव तुमची मेहनत, संघर्ष कायम आठवणीत राहील, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.


राजकारणातील देव माणूस गमावला

काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाला, आम्हा सर्व कॉंग्रेसजनांना प्रचंड मोठा असा धक्का बसला असून अत्यंत प्रामाणिक, पक्षश्रेष्ठींनी दिलेले काम चोखपणे बजावणारे, पक्षश्रेष्ठीचे अत्यंत जवळचे विश्वास पात्र नेते, चुकलेल्यांवरही न रागावता समजावून सांगणारे मितभाषी असलेला राष्ट्रीय नेता अशी स्वताची स्वतंत्र ओळख असलेला राजकारणातील देव माणूस आपल्यातून हरपला आहे, अशा शब्दात बहुजन कल्याण,  मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या . त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या एन तरुण वयात जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही . गुजरात सारख्या राज्याचे प्रभारी म्हणून त्यांनी पार पडलेली जबाबदारी, हीच त्यांच्या कार्याची पावती आहे . बहुजनांचा नेता म्हणून नेतृत्व करीत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात स्थिरावून भविष्यातील राष्ट्रीय राजकारणातील नेता म्हणून भिस्त होती, असा नेता आज आम्ही गमावला आहे . कुठलेही राजकीय पाठबळ नसताना काँग्रेस पक्षाच्या राष्टीय राजकारणात त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मी स्वतः त्याचेंबरोबर लोकसभा निवडणूक प्रचारसभेत सोबत होतो, मोदी लाटेत त्यांनी निवडणूक जिंकली. केवळ एक प्रामाणिक माणूस, समर्पित नेतृत्व  व सच्चा बहुजनांचा नेता म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिले . महाराष्ट्रातून त्यावेळी दोनच खासदार निवडून आले होते त्यात एक राजीव सातव होते . भविष्यातील महाराष्ट्र राज्याचे कर्णधार म्हणून आम्ही त्यांचेकडे बघत होतो . त्यांच्याबाबतीत आठवणी खूप आहेत. त्यांचा शब्दांचा मला खूप मोठा आधार होता तो आधारच आज हरपल्याने मोठे दुःख झाले आहे, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.


युवा नेतृत्वास देश मुकला 

आपल्या कार्याने युवकांसाठी आदर्श ठरलेल्या खासदार राजीव सातव यांचा निधनाने युवा नेतृत्वास देश मुकला आहे, खासदार राजीव सातव यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरूवात मराठवाडा येथून केली. हिंगोली मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी पंचायत समिती सदस्य, जिल्हापरिषद सदस्य, म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. २००९ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. सन २०१४ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत ते लोकसभेवर निवडून गेले होते.  सन २००८-२०१० या कालावधीत महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. त्यांना पक्षाने युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून २०१० ते २०१४ या कालावधीत काम करण्याची संधी दिली. गुजरात निवडणुकीतही भारतीय काँग्रेस पक्षाच्यावतीने त्यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली होती. खासदार राजीव सातव यांचे सर्व पक्षातील लोकांशी मित्रत्वाचे संबंध होते. दूरदृष्टी असलेले एक अजातशत्रू , सात्विक , सोज्वळ  व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. एका कर्तृत्ववान युवा नेत्याच्या अकाली निधनाने भारतीय राजकारणाची व सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे, असेही प्रा. वर्षा गायकवाड यांनी आपल्या शोकसंदेशात  म्हटले आहे.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd Highclonoid Softec Pvt Ltd IBPS test2