All News

जळगांव जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ

जळगांव जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ

जळगाव, दि. १७ जानेवारी : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना परिचारीका कुमुद जवंगार यांनी पहिली लस दिली. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार, अधिपरिचारीका के. एन. नेतकर, वैभव सोनार यांना लस देण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, डॉ. जयकर यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी, डॉक्टर, अधिपरिचारीका, कर्मचारी आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले की, देशाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण आहे. कोरोना संकट काळात ज्यांनी धैर्याने कर्तव्य बजावले अशा आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम कोरोना लस देण्यात येत आहे. लसीकरणाच्या सहाय्याने अनेक आजारांवर देशाने नियंत्रण मिळविले आहे. जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचे संकट असताना कोरोनाला कायमचे हद्दपार करण्यासाठी लसीकरण उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करुन ते पुढे म्हणाले की, कोरोनाची लस आली असली तरी नागरीकांनी काळजी म्हणून मास्क वापरावा, सामाजिक अंतर पाळावे, नेहमी सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यानंतर कोरोना काळात अधिक जोखीम असलेल्या कोरोना योध्दांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

लसीकरणाचेवेळी कोरोना विषयक सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्राचा मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती. को-विन ॲपवरील 


नोंदणीनुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र पाहून तसेच त्यांची थर्मलगन व ऑक्सीमीटरने तपासणी करण्यात येत होती. त्यानंतर त्यांना सामाजिक अंतर राखून प्रतिक्षा कक्षात बसविण्यात येत होते. कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्यानंतर लसीकरण करण्यात येत होते. लसीकरणानंतर ॲपवर लसीकरण झाल्याची नोंद घेण्यात येत होती. लसीकरणानंतर कर्मचाऱ्यांना 30 मिनीटे तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली स्वतंत्र कक्षात ठेवण्यात येत होते. या‍ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास आरोग्याच्या सर्व सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. पालकमंत्र्यांनी प्रतिक्षा कक्षातील कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी शुभेच्छा देऊन निरीक्षण कक्षात लसीकरण झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशीही संवाद साधला.

जिल्हा रुग्णालयासह महापालिकेच्या डी. बी. जैन हॉस्पीटल, उपजिल्हा रुग्णालय, चोपडा आणि जामनेर तसेच ग्रामीण रुग्णालय, पारोळा व चाळीसगाव आणि न. पा. भुसावळ या 7 केंद्रांवर लसीकरणास मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. या सातही केंद्रावर दररोज 100 आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण यांनी सांगितले. 

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd Highclonoid Softec Pvt Ltd IBPS MahaExam