All News

अगोदर ईडीला सामोरे जाऊ, नंतर सीडीचे बघू

अगोदर ईडीला सामोरे जाऊ, नंतर सीडीचे बघू

  • खडसे यांचे स्पष्टीकरण; एकाच मुद्यांवर पाच वेळा चौकशी

जळगाव, दि. २६ डिसेंबर :  ईडीचे 30 डिसेंबर रोजी हजर राहण्यासंदर्भात समन्स मला मिळाले आहे. त्यानुसार मी हजर राहणार आहे. या अगोदर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे आणि नाशिक कार्यालयाने तसेच प्राप्तिकर विभागाने चौकशी केलेली आहे. त्या वेळी मी सर्व कागदपत्रांसह हजर राहिलेलो आहे. आतादेखील ईडी सांगेल त्या प्रमाणे मी त्यांना मदत करायला तयार आहे. भोसरीच्या भूखंड प्रकरणी ही चौकशी होत आहे. आतापर्यंत चारवेळा या संदर्भात चौकशी झालेली असून, ही पाचवी वेळ आहे. आता सध्या ईडीला सामोरा जाणार आहे, सीडीचे नंतर बघू, अशी सूचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिली.  


खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस पाठवण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषेदेत खडसे बोलत होते. ते म्हणाले, की भोसरीचा भूखंड मी नाही माझ्या पत्नाने खरेदी केलेला आहे. त्या ठिकाणचा व्यवहार हा रेडीरेकनरच्या दराप्रमाणे पाच कोटींचा आहे, या प्रकरणी चौकशी होत आहे. आणखी चौकशी करण्याचा ईडीला अधिकार आहे. त्यामुळे ईडीकडून जी काही सूचना येईल, त्याप्रमाणे आवश्यक ते सर्व कागदपत्र मी सादर करेल. ईडीची नोटीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून मला जे फोन येत आहे, त्यातून सहानुभूती व्यक्त केली जात आहे. लोकांना असे वाटते, की हा एक प्रकारचा माझ्यावर अन्याय आहे. वारंवार चौकशा लोकांना आवडलेल्या दिसत नाहीत; पण काही निर्णय असतात, त्या आधीन राहून काम करायचे असते. मी आता जास्त काही बोलणार नाही. जे काही आहे ते नंतर बोलेन, असे ते म्हणाले.


दरम्यान, या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. शिवसेनेच्या लोकांनाही नोटिशी आल्या आहेत. जे तुमच्या विरोधात आहेत, ज्यांच्याशी तुम्ही राजकीय सामना करू शकत नाही, अशा लोकांना ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभागाकडून बळाचा वापर करून नमवण्याचा प्रयत्न करणार असाल, तर तसे होणार नाही. यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यावे आणि मजबूत संघटन उभे करावे अशी आमची भूमिका आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.


दमानिया न्यायालयात जाणार

ज्या खडसे यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सातत्याने लढल्या, त्या दमानिया आता ईडी आणि सीबीआयतच्या गैरवापराविरोधात न्यायालयात जाणार आहेत. ईडी, सीबीआय विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. ईडी, सीबीआय आणि पोलिसांचा सर्रास राजकीय बळासाठी वापर केला जात आहे. आता केंद्रामध्ये भाजप सत्तेत आहे. त्यांनी ईडीचा गैरवापर केला, यात काहीही शंका नाही. त्यामुळे आपण न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, असे दमानिया यांनी सांगितले. 

Advertisement

MahaExam IBPS test 4 Highclonoid Softec Pvt Ltd