All News

ग्रामविकासमध्ये आठ हजार जणांना रोजगार

ग्रामविकासमध्ये आठ हजार जणांना रोजगार

  • राजेश टोपे यांची माहिती; दोन महिन्यांत भरती सुरू होणार

मुंबई, दि. ३१ डिसेंबर :  पुढील काही महिन्यात साधारण आठ हजारांपेक्षा जास्त नोकर भरती आरोग्य आणि ग्रामविकास विभागात केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोना संकटामुळे आरोग्य क्षेत्रात आवश्यक भरती केली जाणार आहे. पुढील दोन महिन्यांत नोकरभरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  


आता आगामी नव्या वर्षात आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्थेची सुविधा कशा प्रकारे असेल, याबाबत टोपे म्हणाले, की आरोग्य आणि ग्रामविकास विभागातील आरोग्य निगडीत पदे लवकरच भरली जाणार आहेत. राज्य शासनाने भरतीला मान्यता दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असून, सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावे. सेवेचा दर्जा उंचावतानाच सौजन्यपूर्ण वागणूक सामान्यांना द्यावी. आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या योजनांच्या माहितीचा फलक प्रत्येक ग्रामपंचायतीवर लावावा. दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करावी, असे आवाहन त्यांनी केले.


हे प्रमाणपत्र शक्य झाल्यास ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय स्तरावर देण्यासाठी प्रयत्न करावेत. दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणांना दिले. 


या वर्षात नागरिकांसह आरोग्य यंत्रणा कोरोनाशी यशस्वी लढा देत आहे. कोरोना नियंत्रणात असला, तरी त्यासाठीचे नियम पाळणे आवश्यक आहे. नवीन वर्ष सर्वांना आरोग्यदायी आणि कोरोनामुक्त जावो, अशा शुभेच्छा आरोग्यमंत्र्यांनी दिल्या. कोरोना काळात सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे काम चांगले झाले असून, आता राज्यात कोरोना स्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. अनेक दिवसांपासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत, त्या तातडीने कराव्यात. मोबाईल सर्जिकल युनिट सुरू करावे, अशा सूचना त्यांनी केल्या. आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज असून, राज्य आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांसाठी संनियंत्रणाची प्रणाली विकसित करावी. जेणेकरून प्रत्येक अधिका-याचे कार्यमूल्यमापन करता येईल, यासाठी संगणक प्रणाली तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd IBPS IBPS Highclonoid Softec Pvt Ltd