All News

उद्योजकांना हवे तीन लाख कोटींचे पॅकेज

उद्योजकांना हवे तीन लाख कोटींचे पॅकेज

नवी दिल्ली, दि. १८ जून  : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत देशातील उद्योगधंद्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने तीन लाख कोटी रुपयांचे पॅकेज देणे आवश्यक असल्याचे उद्योगपतींची संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अर्थात ’सीआयआय’ ने म्हटले आहे.

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्यापक उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच जनधन योजनेचा लाभ घेतलेल्या लोकांच्या बँक खात्यात ठराविक रक्कम टाकणेदेखील आवश्यक आहे. ’सीआयआय’चे अध्यक्ष टी. व्ही. नरेंद्रन यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले. लसीकरण मोहीम झपाट्याने राबविण्यासाठी या क्षेत्रातील एका तज्ज्ञाची तात्काळ नियुक्ती करावी लागेल, अशी टिप्पणीही नरेंद्रन यांनी केली. दुसर्‍या सहामाहीत अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याचा अंदाज आहे. या पार्श्‍वभूमीवर चालू आर्थिक वर्षात जीडीपी दर 9.5 टक्क्यांवर जाऊ शकतो, असे सांगून नरेंद्रन पुढे म्हणाले, की कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा जबरदस्त तडाखा सर्वसामान्य गरीब नागरिकांना बसला आहे. या श्रेणीतील लोकांना तातडीच्या मदतीची गरज आहे. सरकारने परिस्थिती ओळखून लोकांना ही मदत करावी.

भारताची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ग्राहक आधारित अर्थव्यवस्था आहे. अशा स्थितीत ग्राहक मागणीला धक्का लागू नये, याची काळजी सरकारने घेणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सरकारने तीन लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहनात्मक पॅकेज द्यावे. पॅकेजचा आकार वाढत असेल, तर त्याचा समावेश करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आपल्या ताळेबंदाचा विस्तार केला पाहिजे.

Advertisement

IBPS Highclonoid Softec Pvt Ltd IBPS test 4