All News

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच गणेशोत्सव, मोहरम साजरा करणार

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच गणेशोत्सव, मोहरम साजरा करणार

धुळे, दि. २६, ऑगस्ट  : कोरोना विषाणूचे संकट पाहता गणेशोत्सव आणि मोहरमचा सण राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार साजरा करण्यात येईल, अशी ग्वाही उपस्थित सर्वधर्मीय बांधवांनी आज बैठकीत दिली. दरम्यान, नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, खार विकास जमिनी, बंदरे, विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात आज दुपारी गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. आमदार मंजुळाताई गावित, आमदार डॉ. फारुक शाह, जिल्हाधिकारी संजय यादव, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर करावा. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे. तसेच गणेशोत्सव, मोहरमच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती घडवून आणावी. उत्सवाच्या कालावधीत वीज पुरवठा अखंडपणे सुरू राहील याची दक्षता वीज वितरण कंपनीने घ्यावी, असेही निर्देश पालकमंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले, कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात असली, तरी संकट टळलेले नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने काळजी घेतली पाहिजे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. पोलिस अधीक्षक श्री. पंडित यांनी सांगितले, कोरोना विषाणूच्या कालावधीत आलेल्या प्रत्येक सण, उत्सवाच्या वेळी नागरिकांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले आहे. गणेशोत्सव व मोहरमच्या कालावधीत नागरिक सहकार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी हिरामण गवळी, उमेश महाजन, श्री. काझी, रफिक शेख, शव्वाल अन्सारी आदींनी मनोगत व्यक्त करीत जिल्हा प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करू. उत्सव साधेपणाने साजरे करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येईल, असे सांगितले.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd IBPS MahaExam test 4