All News

’मिक्स अँड मॅच’ पद्धतीने देशात लसीकरण

’मिक्स अँड मॅच’ पद्धतीने देशात लसीकरण

  • धोरणात बदलाचे सूतोवाच; निष्कर्षानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी

नवी दिल्ली, दि. ३० मे : देशात कोरोनाच्या लसीकरण धोरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. ’मिक्स अँड मॅच’ पद्धतीने लसीकरण करण्याचे संकेत ’टास्क फोर्स’ने दिले आहेत. यावर वैज्ञानिकांकडून संशोधन होणार असून त्यानंतर येणार्‍या निष्कर्षांच्या आधारे याबाबत निर्णय घेण्यात येईल असे या ’टास्क फोर्स’ने स्पष्ट केले आहे.

देशात लसीकरण व्यवस्था पाहणार्‍या समितीच्या एका वरिष्ठ सदस्याने सांगितले, की, अनेक वेळा असे दिसून आले, की लोकांना दोन भिन्न कंपन्यांच्या लसींचे डोस दिल्यास त्यांच्यामध्ये चांगली इम्युनिटी तयार होते. तसेच आजारांशी लढण्याच्या त्यांच्या क्षमतेतही वाढ होते. देशाच्या विविध राज्यांमध्ये असे प्रकार समोर आले आहेत. त्याअनुषंगाने हेच धोरण राबवण्याचा विचार केला जात आहे. दोन भिन्न कंपन्यांचे डोस दिल्याचे देशातील हे प्रकार निष्काळीजीपणामुळे घडले आहेत; मात्र वैज्ञानिक स्तरावर अशाप्रकारे लसीकरण झाल्याने कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट दिसून आलेले नाहीत. वरिष्ठ वैज्ञानिकांचे म्हणणे आहे, की देशात येणार्‍या काळात ’मिक्स अँड मॅच’ लसीकरणाचा अभ्यास करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याचा आमचा उद्देश आहे. यासाठी सातत्याने अभ्यास होत राहिला असून हा देखील त्याचाच एक भाग आहे.

’टास्क फोर्स’ समितीच्या वरिष्ठ सदस्यांनी सांगितले, की दोन भिन्न कंपन्यांची लस दिल्याने ’इंटरचेंजिबिलिटी’ येते. ’टास्क फोर्स’च्या वरिष्ठ सदस्यांच्या माहितीनुसार, याबाबतची तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच यावर संशोधन केले जाईल. चाचणीसाठी दोन वर्ग तयार केले जातील, त्यानंतर त्याच्या परिणामाची नोंद केली जाईल. दोन भिन्न कंपन्यांच्या लस एकाच व्यक्तीला दिल्याने त्याचा कोणताही साईड इफेक्ट दिसून आलेला नाही. त्यामुळे दोन भिन्न लसींचा प्रयोग जर यशस्वी झाला, तर ’मिक्स अँड मॅच’ लसीकरण व्यवस्था सुरू केली जाईल. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर लस देण्याच्या वेळेपासून संपूर्ण प्रोटोकॉलला नव्या रुपात आणावे लागेल; मात्र हे संपूर्ण प्रकरण हाताळणार्‍या सदस्यांचे म्हणणे आहे, की लसींचा प्रोटोकॉल बदलण्याची गरज नाही. ज्या लोकांना दोन भिन्न कंपन्यांच्या लस देण्यात आल्या आहेत, अशा लोकांवर लसीकरण व्यवस्था सांभाळणारे लोक सातत्याने लक्ष ठेवून आहेत. 


लसीकरणाची प्रतीक्षा संपणार 

या संपूर्ण प्रकरणात शोध घेणार्‍या पथकाचे म्हणणे आहे, की जर सर्वकाही व्यवस्थित राहिले, तर पुढील काही महिन्यांत ’मिक्स अँड मॅच’ व्यवस्था लागू केली जाईल. कारण पुढील तीन-चार महिन्यांमध्ये देशात आणखी काही कंपन्याच्या लस येणार आहेत. या लस आल्यानंतर ही व्यवस्था आणखी मजबूत होईल. त्याचबरोबर ’मिक्स अँड मॅच’ लसीकरण व्यवस्थेमुळे लोकांना खूप जास्त काळ लसींसाठी वाट पाहावी लागणार नाही आणि त्रासही सहन करावा लागणार नाही.  


13 कंपन्या करणार लसनिर्मिती

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी सांगितले, की सध्या 13 कंपन्यांना लस निर्मितीला परवानगी दिली आहे. येत्या काळात आणखी 19 कंपन्यांना निर्मितीची परवानगी दिली जाईल. भारत बायोटेकची उत्पादन क्षमताही वाढवली जात आहे. सध्या भारत बायोटेक दर महिन्याला लसीचे एक कोटी तीस लाख डोस निर्मिती करत आहे. येत्या काही महिन्यांत यात वाढ होऊन ऑक्टोबरपर्यंत कंपनी दर महिन्याला दहा कोटी डोस तयार करेल.

Advertisement

test2 MahaExam test 4 Highclonoid Softec Pvt Ltd