All News

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलली

मुंबई,दि.२६ ऑगस्ट : कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती मुख्य सचिवांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिली. सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल.

विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या पूर्वपरीक्षेचे जिल्हा स्तरावर केंद्र बदलून द्यावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आता थेट न्यायालयात धाव घेतली होती.

महाड दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये

महाड येथे झालेल्या इमारत दुर्घटनेत 14 जण मृत्युमुखी पडले असून मृतांच्या वारसांना राज्य आपत्ती सहायता निधीतून (एसडीआरएफ) प्रत्येकी 4 लाख रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून 1 लाख असे 5 लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.

क्यार व महा चक्रीवादळातील नुकसानीसाठी मच्छिमारांना विशेष आर्थिक सहाय्य

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या “क्यार”  व  “महा” या दोन चक्रीवादळामुळे मच्छीमारांना मासेमारी न करता आल्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल 65 कोटी 17 लाख इतके विशेष सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

रापणकार संघाचे सभासद असणाऱ्यांना प्रति सभासद 10 हजार रुपये असे 4 हजार 171 सभासदांना 4 कोटी 17 लाख,  बिगर यांत्रिक नौकाधारकांना प्रत्येकी 20 हजार प्रमाणे 1 हजार 564 नौकाधारकांना 3 कोटी 12 लाख 80 हजार, 1-2 सिलेंडर नौकाधारकांना प्रत्येकी 20 हजार रुपये प्रमाणे 4 हजार 641 जणांना 9 कोटी 28 लाख 20 हजार,  3-4 सिलेंडर नौकाधारकांना प्रत्येकी 30 हजार प्रमाणे 1 हजार 526 जणांना 4 कोटी 57 लाख 80 हजार, 6 सिलेंडर नौकाधारकांना प्रत्येकी 30 हजार रुपये प्रमाणे 7 हजार 671 जणांना 23 कोटी 1 लाख 30 हजार रुपये, लहान मासळी विक्रेता मच्छिमारांना 50 लि. क्षमतेच्या दोन शितपेटया पुरवठा प्रत्येकी 3 हजार प्रमाणे  35 हजार जणांना 21 कोटी रुपये देण्यात येतील. याचा लाभ 54 हजार 573 मच्छिमारांना मिळेल. हा लाभ त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये (डीबीटी) जमा करण्यात येईल.

अतिरिक्त दूधापासून भुकटी करणारी योजना ऑक्टोबर पर्यंत राबविणार

लॉकडाऊन परिस्थितीत अतिरिक्त दूधाचे भुकटीत रुपांतर करण्याची योजना आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्याकरिता राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

ही भुकटी आदिवासी विकास विभागाच्या भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार या योजनेंतर्गत ६ लाख ५१ हजार मुलांना प्रतिदिन प्रतिविद्यार्थी १८ ग्रॅम याप्रमाणे ६ लाख ५१ हजार मुलांना आणि प्रतिदिन प्रतिमहिला २५ ग्रॅम याप्रमाणे १ लाख २१ हजार गरोदर, स्तनदा मातांना 1 वर्षाकरीता दुग्धव्यवसाय विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचा निर्णयही घेण्यात आला.

संपूर्ण जगभरात कोविड-19 या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात दि.23 मार्च, 2020 पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. या लॉकडाऊनमुळे राज्यात निर्माण होणाऱ्या दूधाच्या मागणीत प्रचंड घट झाल्यामुळे राज्यात अतिरिक्त दूधाची परिस्थिती निर्माण होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधासाठी कमी दर प्राप्त होऊ लागला.

या अतिरिक्त दूधाच्या परिस्थितीत सूधारणा होऊन दुग्धव्यवसायात समतोल राखता यावा यासाठी शासनाने हस्तक्षेप करुन प्रतिदिन 10 लक्ष लिटर मर्यादेपर्यंत दूध स्विकृत करुन सदर दूधाचे रुपांतरण करण्याची योजना घोषित केली होती. सदर योजना दिनांक 6 एप्रिल, 2020 ते 31 जुलै, 2020 पर्यंत राबविण्यात आली. या योजनेद्वारे शासनामार्फत एकूण 5,98,97,020 लिटर इतक्या दूधाची स्विकृती करण्यात आली असून या दूधाच्या रुपांतरणाव्दारे 4421 मे.टन दूध भुकटी 2320 मे.टन इतके देशी कुकींग बटर उत्पादन करण्यात आले.

तथापि, राज्यातील दुग्धव्यवसायात अद्यापही स्थिरता आलेली नसल्याने आज सदर योजना पुनश्च: दि.1 सप्टेंबर, 2020 ते दि.31 ऑक्टोबर, 2020 या 2 महिन्याच्या कालावधीकरीता राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेसाठी शासनामार्फत रु.198.30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय

सध्याचा प्रचलित मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अभिहस्तांतरणपत्राच्या दस्तावरील प्रचलित मुद्रांक शुल्काचा दर दि.1 सप्टेंबर, 2020 पासून ते दि.31 डिसेंबर, 2020 या कालावधीकरिता 3% ने तर दि.1 जानेवारी, 2021 ते दि.31 मार्च, 2021 या कालावधीकरिता 2% ने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd test2 test 4 IBPS