All News

राज्यात ‘पेडियाट्रीक टास्क फोर्स’ची निर्मिती

राज्यात ‘पेडियाट्रीक टास्क फोर्स’ची निर्मिती

  • टोपे यांची माहिती; लसीकरणासाठी आणखी गट पाडणार

मुंबई, दि. ७ मे : राज्यात ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर झालेल्या बैठकीतही या संदर्भात सूतोवाच झालेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्याची आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर 18 वर्षांखालील मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्यात तातडीने ‘पेडियाट्रीक टास्क फोर्स’ची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणात सुसूत्रता येण्यासाठी आणखी वयोगट तयार करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. 


टोपे म्हणाले, की कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर अगोदरच काही महत्वाचे निर्णय घेत आहोत, कारण त्याबद्दलचे सूतोवाच केंद्र शासनाने केलेले आहे. त्यामुळे आम्ही राज्यात ’पेडियाट्रीक टास्क फोर्स’ ताबडतोब तयार करत आहोत.


जी आता 18 वर्षे वयापेक्षा लहान गटातील मुलांचे लसीकरण करता येत नाही. त्यांच्यासाठी लस उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांची काळजी घेणे गरजेचं आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने लागणारे बेड, पेडियाट्रीक व्हेंटिलेटर किंवा जे काही वेगळ्या पद्धतीचे बेड लागतात, तेदेखील आपल्याला तयार करून ठेवले पाहिजेत. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री 10 वाजता अनेक बालरोगतज्ज्ञांशी चर्चा केलेली आहे. त्यामुळे आपण या दृष्टीनेदेखील तयारी करत आहोत. बेडची संख्या वाढवण्याचा विषय असेल, ऑक्सिजन व कोविड संदर्भातील औषधांबाबत स्वयंपूर्ण होण्याचा विषय असेल, याबाबत आपली संपूर्ण तयारी सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. 


महाराष्ट्रासह देशभरात एक मेपासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्यानुसार लसींच्या उपलब्धतेनुसार काही राज्यांनी हे लसीकरण सुरू केले. महाराष्ट्रातदेखील त्याची मोजक्या केंद्रांवर सुरुवात करण्यात आली; मात्र लसींचा तुटवडा आणि त्यातून केंद्रांवर होणारा गोंधळ लक्षात घेता आता राज्य सरकार 18 ते 44 या वयोगटासाठीच्या लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्यामध्येदेखील वेगवेगळे स्लॉट करून त्यानुसार लसीकरण करण्याची शक्यता आहे. हे स्लॉट वयोगट किंवा सहव्याधी यानुसार असू शकतात, असे संकेत टोपे यांनी दिले आहेत. लसींचा साठा अपुरा असल्यामुळे केंद्रांवर लसींचा पुरवठा कमी प्रमाणात केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर 18 ते 44 वयोगटासाठी राज्य सरकारने मोजक्या केंद्रांवरच लसीकरण सुरू केले आहे. त्यामुळे अशा केंद्रांवर या वयोगटातल्या नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे; मात्र त्याविषयी काही समस्या येत असल्याचे टोपे यांनी सांगितले. 


18 ते 44 वयोगटासाठी ग्रामीण भागातल्या केंद्रांवर त्याच भागातले लोक न जाता मेट्रो शहरांमधून ज्यांना तंत्रज्ञानाची जाण आहे अशा लोकांनी कोविन अ‍ॅपवर नोंदणी करून केंद्रांवर जाऊन लसीकरण करून घेतले. त्यामुळे स्थानिक भागात अस्वस्थता निर्माण झाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी मी बोललो. ही समस्या सोडवण्यासाठी लस मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आपल्याला स्लॉट करावे लागणार आहेत. मग वयोगटाचा किंवा कोमॉर्बिडिटीचा स्लॉट देता येईल. म्हणून 35 ते 44 या वयोगटातल्या लोकांना प्राधान्य देता येईल का, त्यातही सहव्याधी असलेल्यांना अधिक प्राधान्य देता येऊ शकेल, असे टोेपे यांनी सांगितले.



स्पुटनिकच्या दराबाबत चर्चा

राज्यात लसीचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी रशियाची स्पुटनिक लस मागवण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू असल्याची माहिती  टोपे यांनी या वेळी दिली. रशियाची स्पुटनिक व्ही ही लस महाराष्ट्रात मागवण्यासाठी चर्चा सुरू आहे. त्यांच्याशी लसीच्या दरांबाबत बोलणी सुरू आहेत, असे ते म्हणाले.


ऑक्सिजनचे 38 प्रकल्प

ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी राज्यात 38 पीएसए प्लांट लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, लसीकरणाविषयीही ताजी आकडेवारी दिली. राज्याने एक कोटी 73 लाख 21 हजार 29 लोकांचे लसीकरण केले आहे. 18 ते 44 या वयोगटासाठी राज्याने दोन लाख 15 हजार 274 लोकांना लसीकरण केले आहे. 28 लाख 66 हजार 631 नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आल आहेत. ही देशात सर्वाधिक संख्या आहे. हवेतून ऑक्सिजन निर्मितीसाठी आपण 38 पीएसए प्लांट कार्यान्वित केले आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी अशा प्लांटच्या 150 हून जास्त ऑर्डर्स दिल्या आहेत. यातून 95 ते 98 टक्के शुद्धतेचा ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकतो. यामुळे लिक्विड ऑक्सिजनची मागणी कमी होऊ शकते. या प्रकल्पांतून 53 टन ऑक्सिजन मिळू शकतो, असे ते म्हणाले.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam IBPS test 4