All News

कोरोना काळात कुपोषण आणि पगारातही घट

कोरोना काळात कुपोषण आणि पगारातही घट

मुंबई, दि. १ मार्च : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीदरम्यान राज्यातील जवळपास 96 टक्के नागरिकांच्या पगारात कपात झाली आहे. राज्यात अन्न हक्क मोहिमेंअंतर्गत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात हे उघड झालं आहे. त्याचबरोबर वीस टक्के लोकांना उपासमारीला तोंड द्यावे लागले आहे. 


’अन्न हक्क मोहिमे’च्या राज्य समन्वयक मुक्ता श्रीवास्तव यांनी सांगितले, की कमाईमध्ये घट येण्याचे मुख्य कारण म्हणजे नोकरी गमावणे आणि काम न मिळणे हे होते. सर्वेक्षण केलेल्या प्रत्येक पाचव्या व्यक्तीला अन्न विकत घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे उपाशी राहावे लागले. या मोहिमेचा एक भाग म्हणून, अन्न व पोषण क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या गटाने गेल्या वर्षी मे आणि सप्टेंबरमध्ये मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नंदुरबार, सोलापूर, पालघर, नाशिक, धुळे आणि जळगाव येथे एकूण 250 लोकांचे सर्वेक्षण केले. केंद्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी मार्चमध्ये देशव्यापी टाळेबंदी जाहीर केली होती. पुढे काही महिन्यांनंतर हळूहळू निर्बंध कमी करण्यात आले. 


श्रीवास्तव यांनी सांगितले, की ज्या लोकांना सर्वेक्षणात सामील केले होत, त्यातील 96 टक्के लोकांच्या कमाईमध्ये या काळात घट झाली आणि टाळेबंदी हटवल्यानंतर जवळपास पाच महिने स्थिती अशीच होती. सर्वेक्षणातील 52 टक्के लोक ग्रामीण भागातील तर उरलेले शहरी भागातील होते. यातील 60 टक्के महिला होत्या. टाळेबंदीच्या आधी यातील 70 टक्के लोकांची महिन्याची कमाई सात हजार रुपये होती, तर इतरांची तीन हजार रुपये होती. आधीपासून इतक्या कमी पगारात घर चालवणार्‍या या कामगारांवर टाळेबंदीचा किती प्रभाव पडला असेल, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. सर्वेक्षणात ज्या लोकांना सामील केले गेले, त्यातील जवळपास 49 टक्के लोकांना भोजनासाठी आपल्या नातेवाइकांकडून किंवा इतर कोणाकडून धान्य उधार घ्यावे लागले. दोन वेळच्या जेवणासाठी 12 टक्के लोकांनी आपले दागिने तर 3 टक्के लोकांनी आपल्या जमिनी विकल्या आहेत.

Advertisement

IBPS Highclonoid Softec Pvt Ltd Highclonoid Softec Pvt Ltd test 4