All News

ममता बॅनर्जींवर हल्ला नाही, अपघात

ममता बॅनर्जींवर हल्ला नाही, अपघात

  • निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण; मुख्य सचिवांच्या अहवालाचा आधार

कोलकात्ता, दि. १४ मार्च : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. राज्याचे मुख्य सचिव अलापन बंडोपाध्याय, विशेष पोलिस निरीक्षक विवेक दुबे आणि अजय नायक यांच्या अहवालाच्या आधारे आयोगाने हा निष्कर्ष काढला. 


बंगालच्या मुख्य सचिवांनी सकाळी पहिला अहवाल दिला, ज्यामध्ये ममताच्या दुखापतीचे कारण त्यांना लागलेला कारचा दरवाजा हे होते. नंतर संध्याकाळी विशेष निरीक्षक विवेक दुबे आणि अजय नायक यांनीही आपले अहवाल सादर केले. नंदीग्राममधील ममताबरोबरची घटना अपघात असल्याचे त्या अहवालात म्हटले होते. त्यांच्या ताफ्यावर कोणत्याही हल्ल्याचा पुरावा मिळालेला नाही. ममता यांच्याबरोबर त्या दिवशी पुरेशी सुरक्षा होती. मुख्य सचिवांनी सविस्तर अहवाल सादर केला यानंतर शनिवारी सायंकाळी उशिरा मुख्य सचिवांनी आपला नवीन चौकशी अहवालही निवडणूक आयोगाला सादर केला. 


दोन्ही अहवालात हल्ल्याचा उल्लेख नाही. घटनेच्या ठिकाणी मोठी गर्दी होती. या प्रसंगाचे कोणतेही स्पष्ट फुटेज नसल्याचे अहवालात नमूद केले आहे. या घटनेनंतर ममतांनी आरोप केला, की चार-पाच लोकांनी ढकलले. जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले, की त्या भागातील केवळ एका दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा बसविला होता; परंतु तोही काम करत नव्हता. उपस्थित लोकसुद्धा कोणतीही विशिष्ट माहिती देऊ शकले नाहीत. यावरून कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे शक्य नाही. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांची भेट घेतली. सौगाता राय म्हणाले, की आम्ही हल्ल्याच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. जेव्हा ही घटना घडली, तेव्हा तेथे कोणताही पोलिस उपस्थित नव्हता. ममता यांनी आपली हत्त्या करण्याचाच हा प्रयत्न होता, असा आरोप केला आहे.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd test2 Highclonoid Softec Pvt Ltd test 4