All News

मराठी भाषा संवर्धनाचे कार्य हेच आपले ध्येय

मराठी भाषा संवर्धनाचे कार्य हेच आपले ध्येय

  • डॉ. किसन पाटील : जळगावात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यास प्रारंभ

जळगाव, दि. १५ जानेवारी  : “मराठी भाषा संवर्धनाचे काम प्रमाणभाषेइतकेच बोलीभाषाही करीत असतात. बोली, प्रमाण आणि प्रशासकीय तसेच साहित्याची भाषा या सर्वच दृष्टीने मराठी भाषेला समृद्ध करण्याची परंपरा खूप जुनीच आहे. मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध होऊन तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपण सर्वांनी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. किसन पाटील यांनी केले.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ शाखा, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, सत्यशोधकी साहित्य परिषद व अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ शाखा यांच्यातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुवारी झाले, त्या वेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रम गुरुवारी दुपारी चारला येथील अथर्व पब्लिकेशन्सच्या कार्यालयात झाला.

निवृत्त शिक्षणाधिकारी तथा ज्येष्ठ साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर, सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा साहित्यिक डॉ. मिलिंद बागूल, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज लायब्ररीयन्स् असोसिएशनचे महासचिव डॉ. विनय पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास आर. रोकडे, डॉ. प्रकाश सपकाळे, डॉ. प्रदीप सुरवाडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी श्री. हिंगोणेकर म्हणाले की, सध्या विद्यार्थ्यांचा कल इंग्रजी भाषेकडे आहे. घरोघरीही  विद्यार्थी मराठीतून बोलतात. मात्र, त्यात इंग्रजीचाही वापर केला जातो. तो आता टाळायला हवा. मराठी या मातृभाषेच्या संवर्धनासाठी मी मराठीमध्ये बोलेल, मराठी भाषेतच वापर करेल, असा संकल्प करण्याची आज गरज निर्माण झाली आहे.

डॉ. मिलिंद बागूल म्हणाले, की प्रमाणभाषा व बोलीभाषा यांचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा राजकीय, शासकीय व्यवहारामध्ये जी भाषा वापरली जाते, तिला प्रमाणभाषाही म्हटले जाते. राज्यात मराठीला प्रमाणभाषा मान्य करण्यात आले आहे. भाषेनेच माणसे जोडली गेली पाहिजे. सध्या भ्रमणध्वनींचा वापर अधिकाधिक केला जातो. त्यावरून मराठीतूनच संदेश पाठविला, तर त्याचा प्रभाव यानिमित्ताने होऊन त्याद्वारे मराठी भाषेला अधिक समृद्ध करू शकतो.

याप्रसंगी डॉ. विनय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला डॉ. रवींद्र माळी, अशोक कोळी, विजयकुमार मौर्य, बापूराव पानपाटील, अथर्व पब्लिकेशन्सचे संचालक युवराज माळी, कुमुद पब्लिकेशन्सच्या संचालिका संगीता माळी, उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे, ज्येष्ठ पत्रकार दीपक महाले आदी उपस्थित होते. डॉ. सुरवाडकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वेध माळी, दीपक साळुंखे, सगीर शेख, सुनील महाजन, शरद महाजन, सुनील पाटील, गिरीश चौगावकर, स्वप्नील फलटणकर आदींनी सहकार्य केले.


पंधरवड्यांतर्गत विविध कार्यक्रमांचे नियोजन

मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, या हेतूने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. यंदा १४ ते २८ जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या पंधवरवड्यांतर्गत विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. त्यात जिल्हाभरातील साहित्यिक, कवी सहभागी होणार आहेत.

Advertisement

MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd test 4 test2