All News

पटोले यांनी स्वीकारले प्रदेशाध्यक्षपद

पटोले यांनी स्वीकारले प्रदेशाध्यक्षपद

  • काँग्रेस सत्तेत राहणार आणि पहिल्या क्रमांकाचा पक्ष होणार असल्याचा दावा 

मुंबई, दि. १२ फेब्रुवारी :  काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत मावळते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडून औपचारिकरित्या पदभार स्वीकारला. मुंबईतील टिळक भवन येथे हा कार्यक्रम पार पडला, त्यानंतर मुंबईत काँग्रेसने शक्तीप्रदर्शन करून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत ट्रॅक्टर रॅली काढली. या वेळी हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. पटोले यांनी काँग्रेस सत्तेत राहणारच आणि पहिल्या क्रमाकांचा पक्षही होणार असा दावा केला. 


मरिन ड्राइव्ह ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीदरम्यान पटोले यांनी ट्रॅक्टर चालवत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. ते म्हणाले, की नरेंद्र मोदी यांनी देशाच्या शेतकर्‍यांचा अपमान केला आहे. राज्यसभेच्या माध्यमातून आंदोलनावर टीका केली, त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे पाप केले. या माध्यमातून आम्ही देशाच्या अन्नदात्याचा अपमान करणार्‍यांविरोधात नवी व्यवस्था निर्माण केली जाईल असा संदेश देत आहोत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असतानादेखील शंभर रुपयांपर्यंत पेट्रोलचे दर गेले आहेत. देशातील जनतेची लूट सुरू आहे. महागाईविरोधातही आम्हाला संदेश द्यायचा आहे. 


मी परवा नागपुरात होतो. नागपुरातही परिवर्तनाची लाट दिसली. महाराष्ट्रात आज जी लाट दिसत आहे, ती केंद्रातील हुकूमशाही सरकारविरोधातील परिवर्तनाची लाट आहे. मुंबईत महात्मा गांधींनी परकीयांना बाहेर काढण्याचा जो विचार मांडला, तोच विचार आम्ही मांडत आहोत. देशातील हुकूमशाही मोदी सरकारविरोधात ‘चले जाव’ ची घोषणा आम्ही देणार आहोत, असे पटोले यांनी म्हटले आहे. काँग्रेस महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. पुढे काँग्रेसच महाराष्ट्रात सत्तेत राहणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्ष हा सोशल मीडियाच्या माध्यमातून विखारी प्रचार करत असून समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे; परंतु भाजपच्या या विखारी प्रचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी काँग्रेसचा सोशल मीडियाही सक्रिय झाला आहे. सोशल मीडियाच्या या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काँग्रेसचे दोन लाख गांधीदूत भाजपच्या विखारी प्रचाराला चोख उत्तर देतील, असे त्यांनी म्हटले आहे.


या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री सुनील केदार, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्यास नाना पटोले पुष्पहार अर्पण करून विधानभवन येथील महापुरुषांना तसेच दक्षिण मुंबईतील महापुरुषांना अभिवादन केले. त्याचसोबत हुतात्मा चौकात जाऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले.


भाजप खोटी माहिती पसरवणारी फॅक्टरी

राजीव गांधी यांनी देशाला एकविसाव्या शतकात नेण्याचे स्वप्न पाहून आधुनिक तंत्रज्ञान आणले. त्या वेळी हेच भाजपवाले त्याला तीव्र विरोध करत होते; मात्र त्याच तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून भाजप आज समाजात खोटी माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करत आहे. भाजप हा खोटी माहिती पसरवणारी मोठी फॅक्टरी आहे; पण आता याच माध्यमातून भाजपला काँग्रेसकडून उत्तर मिळेल, असा इशारा पटोले यांनी दिला होता.

Advertisement

MahaExam IBPS IBPS Highclonoid Softec Pvt Ltd