All News

नियम मोडणाऱ्या गृहविलगीकरणातील कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवा : कृषिमंत्री दादा भुसे

नियम मोडणाऱ्या गृहविलगीकरणातील कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवा : कृषिमंत्री  दादा भुसे

मालेगाव, दि. २ एप्रिल  : ग्रामीण भागातील ज्या गावात कोरोनाची रुग्णसंख्या अधिक आहे, अशा गावांमध्ये पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी, ग्रामीण भागातील गृहविलगीकरणातील रुग्णांची यादी आरोग्य प्रशासनाने पोलीस प्रशासनास देऊन नियम मोडणाऱ्या कोरोना रुग्णांवर वचक बसविण्यासाठी पोलीस प्रशासनाने उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज दिले.


शहरासह ग्रामीण भागात कोरोना पाय पसरत असून त्याला रोखण्यासाठी आज मालेगाव येथील शासकीय विश्रामगृहात सर्व विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्याप्रसंगी मंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.


मंत्री श्री.भुसे म्हणाले, ज्या गावात कोरोनाची रुग्णसंख्या अधिक आहे अशा गावातील परिस्थितीचा विचार करून गावपातळीवर कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न होण्याबरोबरच मालेगाव तालुक्यात पुरेसा रेमडेसिव्हीरचा मुबलक साठा उपलब्ध करून द्यावा. सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन टँक तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करण्यात यावे. प्राथमिक पातळीवर नागरिकांनी उपचारासाठी पुढे येण्याचे आवाहन करतानाच शिस्त व आरोग्य प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन केल्यास लॉकडाऊनची आवश्यकता भासणार नाही, असेही मंत्री श्री. भुसे यावेळी म्हणाले.


कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्ट्राँग प्रतिबंधित क्षेत्र गरजेचे : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असून, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्ट्राँग प्रतिबंधित क्षेत्र गरजेचे आहे. यासोबत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याबरोबर कोरोना चाचण्या वाढविण्यासाठी सर्वांनी ताकदीने प्रयत्न करणे गरजेचे असून यातूनच कोरोना संसर्गाची साखळी तोडणे शक्य होईल, असा विश्वास विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज व्यक्त केला.


शहरासह ग्रामीण भागातील सर्व प्रतिबंधित क्षेत्रात तात्काळ बॅरिकेटिंग करण्याच्या सूचना देताना आयुक्त श्री.गमे म्हणाले, प्रत्येक बॅरेकेटींग केलेल्या भागात सूचनांचे दर्शनी फलक लावण्यात यावे. या भागातील नागरिकांचा संचार तात्काळ थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेण्यात यावी. प्रत्येक बाधित रुग्णामागे त्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून अँटीजन चाचण्यांवर भर देण्यात यावा. गृहविलगीकरणासह प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करून अशा रुग्णांच्या मोबाईलमध्ये सक्तीने ‘महाकवच’ ॲप चा समावेश केल्यास अशा रुग्णांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी दर दिवशी आढावा घेण्यात यावा. मनुष्यबळाची बचत करण्यासाठी ड्युरा ऑक्सिजन सिलेंडरचा वापर करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी यावेळी दिल्या.


वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राशिवाय एचआरसीटी करू नये : जिल्हाधिकारी मांढरे

आरटीपीसीआर व अँटीजन चाचणी केल्यानंतरही काही लोक एचआरसीटी चाचणी करण्यासाठी आग्रही असतात, यामुळे एचआरसीटी सेंटरच स्प्रेडींग सेंटर होऊ नये, यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राशिवाय एचआरसीटी चाचण्या करण्यात येऊ नये, असे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले. गतवर्षी कोरोना रोखण्यासाठी मृत्यूची भीती काम करत होती तर, आता यंत्रणेला काम करावे लागेल. यासाठी आरोग्य प्रशासनातील कामाचा विलंब टाळण्यासाठी डॉ.हितेश महाले यांना अधिकार प्रदान करण्यासाठी आजच आदेश निर्गमित करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. मालेगाव महानगरपालिकेत कायमस्वरूपी किमान पाचशे रेमडेसिव्हीरचा साठा राहण्यासह शहरात रेमडेसिव्हीरचा तुटवडा भासणार नाही, यासाठी अन्न व औषध प्रशासनासही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी यावेळी निर्देशित केले.


यानंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची पहाणी केली. त्यानंतर सहारा रुग्णालयासह दाभाडी येथील कोविड रुग्णालयाची पहाणी करून दाभाडी गावातील प्रतिबंधित क्षेत्रातील गृहविलगीकरणातील महिला रुग्णांशी संवाद साधत त्यांची नियमित तपासणीसह औषधोपचाराबाबत माहिती जाणून घेतली.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd test2 MahaExam IBPS