All News

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या फोटोवरून नवा वाद

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या  फोटोवरून नवा वाद

लखनऊ,  दि. २० जानेवारी :  उत्तर प्रदेशच्या विधानसभेमधील फोटोगॅलरीमध्ये लावण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या फोटोवरून नवीन वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे आमदार दिपक  सिंग यांनी सावरकरांचा फोटो विधानसभेच्या कक्षामध्ये लावण्यास आक्षेप घेतला आहे. त्यांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले असून हा फोटो काढण्याची मागणी केली आहे. 


सावरकरांचा फोटो भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यसेनानींच्या पंक्तीत लावण्यात आला आहे. ब्रिटिश साम्राज्याने केलेले अनेक अत्याचार सहन करूनही त्यांच्यासमोर न झुकलेल्या आणि हालअपेष्टा सहन करूनही भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढत राहिलेल्या या स्वातंत्र्यसैनिकांच्या पंक्तीमध्ये सावरकरांचा फोटो लावणे हा या महान व्यक्तींचा अपमान आहे, असे सिंग यांनी अध्यक्ष रमेश यादव यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. मंगळवारीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या फोटोचे अनावरण करण्यात आले होते. त्यानंतर लगेचच सिंग यांनी हे पत्र लिहिले आहे.


सिंग यांनी सावरकरांचा फोटो काढून तो भाजपच्या कार्यालयामध्ये लावावा, असेही म्हटले आहे. या प्रकरणामध्ये अध्यक्षांनी मुख्य सचिवांना लक्ष घालण्याचे आदेश दिल्याची माहिती सिंग यांनी दिली आहे. हे प्रकरण पूर्णपणे समजून घेत यासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा, असे आदेश अध्यक्षांनी मुख्य सचिवांना दिल्याचे समजते.


या संदर्भात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी, देशातील तरुणांमध्ये यासंदर्भात चर्चा घडवून आणण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासंदर्भात तरुणांमध्ये चर्चा घडवून आणली पाहिजे. त्यानंतर देशाच्या स्वातंत्र्यासाठी कोण लढले आणि कोणी यामध्ये योगदान दिले हे स्पष्ट होईल. तेव्हाच आपण या लढ्यात सहभागी झालेल्यांचा योग्य सन्मान केला पाहिजे, असे यादव म्हणाले. सावरकरांच्या या फोटोचे अनावरण करताना योगी आदित्यनाथ यांनी सावरकर हे थोर स्वातंत्र्यसेनानी होते तसेच सावरकरांच्या व्यक्तिमत्वामुळे आजही भारतीयांना प्रेरणा मिळत असल्याचे म्हटले होते.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd test2 Highclonoid Softec Pvt Ltd test 4