नवी दिल्ली, दि. २३ मे : भारतीय ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमार याला आज दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या मुंडका भागातून अटक केली. कुस्तीपटू सागर राणा हत्या प्रकरणात सुशील कुमारला पोलिसांनी अटक केली आहे. 4 मे च्या रात्री सागर राणाची छ्त्रसाल स्टेडियमजवळ हत्या झाली होती. तेव्हापासून सुशील कुमार गायब होता.
न्यायालयाने सुशील कुमारच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. अखेर आज सुशील कुमारला पोलिसांनी अटक केली. गेल्या 18 दिवसांत आपली अटक टाळण्यासाठी सुशील कुमार तब्बल 7 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून फिरल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. त्याला अटक केल्यानंतर झालेल्या प्राथमिक चौकशीत ही बाब समोर आली आहे. रविवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारला राजधानीच्या मुंडका परिसरातून अटक केली. या वेळी सुशील कुमार बाईकवरून पोलिसांना गुंगारा देऊन निसटण्याच्या प्रयत्नात होता. सागर राणाच्या मृत्यूनंतर चार मे रोजी मध्यरात्रीपासून कुस्तीपटू सुशील कुमार फरार होता. तो सातत्याने त्याचे ठिकाण बदलत होता. तसेच, या 18 दिवसांमध्ये त्याने अनेकदा सिमकार्डदेखील बदलले आहेत. या काळात सुशील कुमार उत्तराखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरयाणा, चंदीगड आणि पंजाब या राज्यांमध्ये फिरला. दिल्लीची सीमारेषा त्याने दोनदा पार केली. त्यामुळे एकूण सहा वेळा राज्यांच्या सीमा आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाची सीमा सुशील कुमार याने ओलांडली.
सागर राणाचा मृत्यू झाल्यानंतर सुशील कुमार आधी उत्तराखंडमध्ये ऋषिकेशला गेला. तिथे तो एका साधूंच्या आश्रमात राहिला. तिथून दुसर्याच दिवशी तो दिल्लीला परतला. मीरत टोल प्लाझावर तो सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. दिल्लीहून तो हरयाणामध्ये बहादूरगडला गेला. तिथून तो चंदीगडला गेला. चंदीगडहून सुशील कुमार पंजाबमध्ये भटिंडाला गेला. भटिंडाहून तो माघारी गुरुग्रामला आला. पश्चिम दिल्लीमध्ये तो काही काळ राहिला. इथूनही त्याचा पुन्हा निसटण्याचा प्रयत्न होता; मात्र बहादूरगडचा रहिवासी असलेल्या बबलूने सुशील कुमार कोणती कार वापरतोय, हे सांगितल्यामुळे पोलिसांचा त्याचा माग काढणे सोपे झाले; मात्र आज त्याचा मित्र अजयसोबत एका बाईकवरून जाताना पोलिसांनी मुंडका परिसरातून त्याला अटक केली. सुशील कुमारने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता; मात्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावत त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस काढली. तसेच अजामीनपात्र वॉरंटदेखील जारी करण्यात आले होते. पोलिसांनी सुशील कुमारची माहिती देणार्यास एक लाख तर त्याचा मित्र अजय बक्करवालाची माहिती देणार्यास 50 हजार रुपयांचे इनाम जाहीर केले होते.
Copyright © 2023 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.