All News

पूजा चव्हाणची आत्महत्या नव्हे, अपघात?

पूजा चव्हाणची आत्महत्या नव्हे, अपघात?

मुंबई, दि. १४ फेब्रुवारी : पूजा चव्हाण हिने आत्महत्या केली नाही, तर ती चक्कर येऊन पडली, असा जबाब पूजासोबत असलेल्या दोघांनी दिल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. दरम्यान, पूजाच्या आजोबांनी या घटनेची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली आहे. अटक केलेल्या दोघांना दोन तासांत सोडल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी संताप व्यक्त केला असून, ही मोगलाई आहे का, असा सवाल केला आहे. वानवडी पोलिसांनी अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांचा जबाब नोंदवला आहे.


पूजाने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडल्याचा जबाब तिच्यासोबत असलेल्या दोघांनी पोलिसांना दिल्याची माहिती मिळत आहे. पूजा चव्हाणच्या आईवडीलांचा जबाबत पोलिसांनी यापूर्वीच नोंदवला आहे. या घटनेचा उलगडा होण्यापर्यंत तपास सुरू राहणार आहे. पोलिस महासंचालकांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिस महासंचालकांना चौकशी अहवाल सादर केला जाणार असल्याचीही माहिती आहे. पूजाच्या आत्महत्येची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी तिच्या आजोबांनी केली आहे. सरकारने सीआयडीसारख्या यंत्रणेमार्फत या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी आजोबांनी केली आहे. 


चंद्रकांत पाटील यांनी पोलिस तपासावरून गंभीर आरोप केले आहेत. पूजाच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना पोलिसांनी दोन तासात कसे सोडले? ही काय मोगलाई आहे का? असे सवाल करतानाच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप पाटील यांनी केला आहे. ऑडिओ क्लिपमध्ये त्या मुलांचा आवाज आहे, तरीही त्या मुलांना सोडून देण्यात आले. पूजाप्रकरणी पाटील यांनी अनेक सवाल उपस्थित केले. मोबाईलमधील संवाद कुणाचे आहेत. ज्यांचे नाव या प्रकरणात येत आहे, ते सध्या कुठे आहेत? पूजाचा मोबाईल आणि लॅपटॉप कुठे आहे? शवविच्छेदन अहवाल दोन कसे आले? आदी प्रश्नांचा भडिमार त्यांनी केला.


पूजाची बदनामी

समाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे प्रकरणात रेणू शर्मावर जसे आरोप करण्यात आले, तशाच प्रकारे आता पूजाची बदनामी करण्यात येत आहे. पूजा दारू पित होती, तिचे इतरांशी संबंध होते, अशी तिची बदनामी सुरू झाली असून हे अत्यंत चुकीचे आहे, असे ते म्हणाले.

Advertisement

test 4 test2 IBPS Highclonoid Softec Pvt Ltd