All News

जिल्ह्यातील पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

जिल्ह्यातील पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

वाशिम, दि. १८ ऑक्टोबर : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन, कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचमाने तातडीने पूर्ण करून विहित नमुन्यातील प्रस्ताव लवकरात लवकर शासनाला सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

 

यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गिरीश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, पाटबंधारे विभागाचे प्र. अधीक्षक अभियंता प्रशांत बोरसे, महावितरणचे श्री. चव्हाण, पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. बोरकर आदी उपस्थित होते.

 

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या गावांमधील पीक नुकसानाचे पंचमाने करण्यासाठी तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामसेवक यांची पुरेशी पथके तयार करावीत. तसेच त्यांना पंचनाम्याची कार्यवाही गतीने पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात. सदर पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा अहवाल विहित मार्गाने शासनाला लवकरात लवकर सादर करावा, या कामास विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

 

काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली नसली तरी परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असल्यास सदर नुकसानीचा स्वतंत्र प्राथमिक अहवाल तयार करून मदत व पुनर्वसन विभाला सादर करावा. आपला जिल्हा आकांक्षित जिल्हा असल्याने या नुकसानीची भरपाई मिळविण्यासाठी सुद्धा शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री श्री. देसाई यावेळी म्हणाले.

 

अतिवृष्टी झालेल्या परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या योजना, वीज वाहिन्या व रस्त्यांचे नुकसान झाले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेने मोहीम स्वरुपात सर्व पाणी पुरवठा योजनांचे स्त्रोत व वाहिन्यांची तपासणी करून या योजना सुरु असल्याची खात्री करावी. महावितरणनेसुद्धा त्वरित कार्यवाही करून वीज वितरण व्यवस्था पूर्ववत करावी. तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांचे नुकसान झाले असल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीसाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.

 

जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची प्राथमिक माहिती दिली. तसेच या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कार्यवाहीबाबत माहिती दिली.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd IBPS Highclonoid Softec Pvt Ltd test 4