All News

रुग्णांच्या संख्येनुसार रेमडेसिवीरचा साठा द्या : पालकमंत्री छगन भुजबळ

रुग्णांच्या संख्येनुसार रेमडेसिवीरचा साठा द्या  : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि. २६ एप्रिल : नाशिक जिल्ह्यात रुग्णसंख्येच्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध नसल्याने राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ हे गेल्या तीन दिवसांपासून राज्याचे अन्न, औषध प्रशासनाचे आयुक्त परिमल सिंग यांच्याशी सातत्याने संपर्क करून पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना देत होते. मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील साठा सुरळीत होत नसल्याने आज मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्याला रेमडेसिवीर इंजेक्शन निश्चित सूत्रानुसार वितरित करावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दूरध्वनीद्वारे केली आहे. तसेच याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.


यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्राने रेमडेसिवीर इंजेक्शनचा डबल कोटा केल्यामुळे डबलच्या हिशोबाने तसे वाटपसुद्धा सुरू करण्यात आले. मात्र स्टॉकिस्टने वाढीव रेमडेसिवीरचा साठा दिलाच नाही.त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये कमी साठा मिळाला मात्र मी यात लक्ष घालून नाशिकवर अन्याय होऊ देणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी मंत्री श्री. भुजबळ यांना सांगितले.


याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यासाठी दररोज दहा हजार रेमडेसिवीरची मागणी असताना नाशिकला केवळ ४५० इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत बाधितांची संख्या इतर शहरांपेक्षा नाशिक शहर व जिल्ह्यात अधिक असताना नाशिकमध्ये कमी प्रमाणात रेमडेसिवीरचा पुरवठा होत असल्याने नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांचे हाल होत असल्याचे म्हटले आहे.


त्यांनी म्हटले आहे की, रेमडेसिवीर इंजेक्शनचे समन्यायी पद्धतीने वाटपासाठी राज्यस्तरावरून वाटप करत असताना सक्रिय रुग्णसंख्या विचारात घेऊन सदर इंजेक्शन वाटपाचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर राज्यातील सदर उत्पादकांद्वारे सदर साठा पुढील वितरणासाठी संबंधित जिल्ह्यातील वितरकांकडे प्राप्त होईल व सर्व जिल्हाधिकारी सदर साठा जिल्ह्यामध्ये त्वरित वितरित करतील अशा सूचना आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील दि. २० एप्रिल २०२१ रोजीची सक्रिय रुग्णसंख्या ही राज्याच्या एकूण रुग्णसंखेच्या ६.४८% असल्याचे दर्शविले आहे.


धुळे व अहमदनगर जिल्ह्याकरिता देण्यात येणारा रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा नाशिक येथील वितरकांना देण्यात येतो. त्यामुळे सदर साठा प्रत्यक्षात इतर जिल्ह्यांना जाणार असला तरी सुद्धा नाशिकच्या नावे नोंदविला जात असल्याने प्रत्यक्षात नाशिकला कमी साठा उपलब्ध होतो.


रुग्णसंख्येच्या तुलनेत जो साठा उपलब्ध व्हायला पाहिजे त्यापेक्षा कमी साठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यात जात असलेला साठा हा त्याच जिल्ह्याच्या वितरकांचे नावे देण्याबाबत सदर कंपनीचे अधिकारी यांना सूचित करण्यात येऊन नाशिक जिल्ह्यात रुग्णांच्या तुलनेत येत असलेला रेमडेसिवीरचा साठा अतिशय कमी येत असल्याने नाशिककरांवर हा मोठ्या अन्याय होत आहे. नाशिक जिल्ह्यातील रेमडेसिवीरचा साठा सुरळीत करून हा अन्याय आपण दूर करावा अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Advertisement

MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd IBPS test 4