All News

सोयाबीन हमी भावाने खरेदीला १५ ऑक्टोबरपासून सुरुवात

सोयाबीन हमी भावाने खरेदीला १५ ऑक्टोबरपासून सुरुवात

मुंबई, दि. २९ सप्टेंबर  : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने सोयाबीन खरेदीसाठीची नोंदणी दि. १ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. खरेदीला सुरुवात दि.१५ ऑक्टोबर २०२० पासून होणार आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

श्री.पाटील म्हणाले, केंद्र शासनाने प्रती क्विंटलप्रमाणे सोयाबीनसाठी हमी भाव ३ हजार ८८० रुपये असा जाहीर केला आहे. चालू हंगामात सोयाबीनची आवक बाजारात सुरु झाली आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी खरेदी केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. खरेदी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी दि.१ ऑक्टोबर २०२० पासून नोंदणी प्रक्रिया सुरु होत आहे.

नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार सोयाबीन खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे त्याच केंद्रावर एसएमएस आल्यानंतरच शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा. सर्व खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी आपआपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. नोंदणीकरिता आधारकार्डाची छायांकित प्रत आणि पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करावा. तसेच शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर नोंदवावा.

केंद्र शासनाकडे हमीभावाने सोयाबीन खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव दि.१८ सप्टेंबर २०२० ला पाठविण्यात आला होता त्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे, असेही श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

Advertisement

IBPS IBPS MahaExam test 4