All News

हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे द्या

हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे द्या

  • ठाण्याच्या न्यायालयाचा एटीएसला आदेश; सरकार अडचणीत

मुंबई, दि. २४ मार्च : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून राज्यात एनआयए विरुद्ध एटीएस असा अघोषित सामना सुरू झाला होता. या प्रकरणाचा तपास हाती घेण्याचे निर्देश एनआयएने केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आणले असूनही एटीएसने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला नव्हता. एवढेच नव्हे, तर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशांनंतरदेखील एटीएसने या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असून मंगळवारी या प्रकरणावर पत्रकार परिषद घेतली होती. अखेर ठाण्यातील सत्र न्यायालयानेच एटीएसला या प्रकरणाचा तपास थांबवण्याचे आदेश दिले आहेत. हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरीत करा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत 


केंद्रीय गृहमंत्रालयाने आदेश देऊनदेखील महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण हस्तांतरीत करीत नसल्याची तक्रार एनआयएने ठाणे सत्र न्यायालयात केली होती. एनआयएची ही तक्रार मान्य करत सत्र न्यायालयाने एटीएसला हे आदेश दिले आहेत. एटीएसने आत्तापर्यंत केलेल्या तपासाची कागदपत्रे, पुरावे आणि त्यासोबतच अटक करण्यात आलेले दोन आरोपी, निलंबित पोलिस हवालदार विनायक शिंदे आणि बुकी नरेश गोर या दोघांना देखील एनआयएच्या ताब्यात देण्यात यावे, असेदेखील न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. या प्रकरणातील महत्त्वाची कडी ठरलेले निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने याआधीच अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणात अटक केली आहे. आता मनसुख हिरेन प्रकरणदेखील एनआयएकडे आल्यामुळे या दोन्ही प्रकरणांवर वाझेंची चौकशी करण्याचा मार्ग एनआयएसाठी मोकळा झाला आहे. 


मंगळवारी एटीएसने पत्रकार परिषद घेऊन वाझेंनीच विनायक शिंदे या पॅरोलवरील आरोपीचा वापर करून गुन्ह्यामध्ये सहभाग ठेवल्याचे स्पष्ट केले होते. वाझेंच्या सांगण्यावरूनच विनायक शिंदेने गुन्ह्यात वापरलेली सिमकार्ड खरेदी करून ती इतरांना दिली होती. त्यानुसार या प्रकरणात अजून काहींनी अटक होण्याची शक्यता आहे, असेदेखील एटीएसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, अंबानी स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपासयंत्रणेकडून वाझे यांच्यावर यूपीए कायद्याअंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. एनआयए वाझेंविरोधात यूएपीएची कलम लावण्याची तयारी सुरू केली आहे. एनआयएच्या हाती नुकतेच वाझे यांच्या ट्रायडंट हॉटेलमधील मुक्कामाचे आणखी काही तपशील समोर आले आहेत. यूएपीए कायदा लागल्यास यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. हा कायदा सहसा दहशतवाद्यांवर किंवा राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभाग असणार्‍यांवर लावला जातो.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam IBPS IBPS