ब्रिटीश वसाहतीपासून भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ व्या वर्षात पदापर्ण करण्याच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांची तयारी १५ ऑगस्ट २०२१ पासून सुरु होईल. २०४७मधे भारताच्या स्वातंत्र्याची शतकपूर्ती होईल. त्यावेळचा भारत डोळ्यासमोर ठेवून, त्यादृष्टीने आता आपण आपल्या कार्याची दिशा निश्चित केली पाहिजे. मोठ्या भाग्यानेच या भारतभूमीत जन्म मिळतो.
पश्चिमेकडून परत आल्यावर आपल्या पहिल्याच व्याख्यानात स्वामी विवेकानंद अतिशय ठामपणे म्हणाले होते की, “ ह्या पृथ्वीच्या पाठीवर जर असा कोणता एखादा देश असेल की ज्याला 'पुण्यभूमी' हे गोड आणि अन्वर्थक नाव अगदी यथार्थपणे देता येईल, जर असे कोणते एखादे स्थान असेल की जेथे जगामधील सर्व जीवांना आपल्या कर्मफलाचा उपभोग घेण्यास्तव यावे लागेल, जर असे एखादे ठिकाण असेल की भगवत्-लाभाची आकांक्षा बाळगणाऱ्या प्रत्येकाला अंती जिथे येऊन दाखल व्हावेच लागेल, जर असे एखादे स्थान असेल की जिथे माणसात कोमलता, शुचिता, दया, दाक्षिण्य, क्षमा प्रभृती सद्गुणांचा इतर कुठल्याहीपेक्षा अधिक विकास झाला आहे, जर अशी कोणती एखादी भूमी असेल की जिला अंतर्दृष्टीचे आणि आध्यात्मिकतेचे माहेरघर म्हणता येईल तर ती म्हणजे आपली ही मायभूमी भारतच होय. अत्यंत प्राचीन कालापासून येथे भिन्न भिन्न धर्माच्या संस्थापकांचा उदय झाला असून त्यांनी परमपवित्र आणि सनातन अशा आध्यात्मिक सत्याच्या शांतिजलाने ह्या जगाला वारंवार शमविले आहे, आध्यात्मिकतेच्या लोंढ्यांनी त्यांनी हे जग पुन्हापुन्हा तुडुंब भरून टाकले आहे. येथून उद्भवलेल्या तत्त्वज्ञानाच्या प्रचंड पुराने उत्तर-दक्षिण पूर्व-पश्चिम समस्त दिशा, सारे जग व्यापून टाकले आहे आणि येथूनच फिरून अशी एक लाट उठणार आहे की जी आधुनिक जगाच्या इहलोकनिष्ठ सभ्यतेला आध्यात्मिक संजीवन प्रदान करणार आहे. इतर देशांतील लक्षावधी, कोट्यवधी स्त्री-पुरुषांच्या जीवनाचा दाह करणारा, त्यांची हृदये करपून टाकणारा जडवादाचा वन्हीं विझविण्याचे सामर्थ्य असलेल्या अमृतोपम शांतिजलाचा अक्षय ठेवा एकमात्र या आपल्या भारतभूमीतच विद्यमान आहे.. बंधूंनो, विश्वास ठेवा घटना अशीच घडणार आहे आपला भारतच जगाला अध्यात्माचे पसायदान देणार आहे. ” (भारतीय व्याख्याने)
भारताने केवळ स्वतःसाठी नव्हे तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी सामर्थ्याने उठून उभे रहावे, हा दृष्टिकोन स्वातंत्र्य चळवळीच्या प्रेरणास्थानी होता. भारताने आपले राष्ट्रीयत्व जीवनाच्या सर्वक्षेत्रात व्यक्त करणे आवश्यक आहे. म्हणूनच स्वामी विवेकानंदांनी भारत जगद्गुरू होण्यासाठी ‘हिंदू तेजा जाग रे!’ (rousing call to hindu nation!) अशी साद घातली आहे. श्री अरविंदांना सनातन धर्म हेच आपले राष्ट्रीयत्व आहे हे सत्य समजून आले. ते त्यांनी मांडले आहे. श्री. बंकीम चंद्र चटर्जींना ‘भारतमाता दशप्रहरणधारिणी’ दुर्गेच्या रुपात दिसली. महात्मा गांधींची भारताच्या स्वातंत्र्याबरोबरच रामराज्य येईल अशी महत्वाकांक्षा होती. या सर्व महापुरुषांच्या स्वप्नातला भारत अजून प्रत्यक्षात यायचा आहे.
आपण भारत मातेची लेकरे आहोत. आपण आपल्या ऋषींचे संतान, त्यांचे वारसदार म्हणून त्यांचे कार्य पुढे चालवले पाहिजे. भारत आतापर्यंत सर्व आक्रमणे, अत्याचार, संकटातून बाहेर पडला आहे, कारण त्याच्यासमोर अखिल मानवजातीच्या उत्क्रांतीचे दैवी ध्येय आहे. या शुभ मुहूर्तावर आपण फक्त आपल्या सांसारिक गरजांचाच फक्त विचार करणार आहोत का? आपल्या देशाबद्दल, स्वातंत्र्यसैनिकांबद्दल आपल्या मनात असलेला अभिमान, प्रेम,आपल्या कृतीतून व्यक्त करण्याची वेळ आली आहे. कोणताही त्याग हलका, कमी प्रतीचा नाही. महान त्यागामुळेच महान कार्ये पूर्ण होतात. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्ष पदार्पणाच्या निमित्ताने आपण संकल्प करूया, की ‘ जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आपले राष्ट्रीयत्व व्यक्त होण्यासाठी आम्ही अविरत काम करू. आपण आपल्या नगरस्थानांत ७५ लोक केंद्राशी जोडले जातील असा संकल्प करूया. असे लोक की जे केंद्रकार्यासाठी किमान वर्षभर रोज, कमीत कमी एक तास काम करतील. २०४७ मधे स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीच्या वेळेस, भारतमाता तिच्या सर्व वैभवानिशी, अखिल मानवजातीला मार्गदर्शन करेल, या साठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.
"भारता ऊठ! संपूर्ण जग उजळवून टाक !!"
माननीय निवेदिताताई
उपाध्यक्ष
विवेकानंद केंद्र- कन्याकुमारी
Copyright © 2023 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.