All News

’सीरम’ने मागितली स्पुटनिकच्या निर्मितीची परवानगी

’सीरम’ने मागितली स्पुटनिकच्या निर्मितीची परवानगी


नवी दिल्ली, दि. ४  जून : ’सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने ’ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’कडे रशियाच्या स्पुटनिक वी या कोरोना प्रतिबंधक लसीच्या निर्मितीसाठी चाचणीची परवानगी मागितली आहे. ही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सध्या ’सीरम’ भारतामध्ये कोविशिल्ड लसीचे उत्पादन करत आहे.

कोविशील्ड लसीच्या आपत्कालीन वापरला भारत सरकारने मंजुरी दिलेली आहे. ’सीरम’ ने बुधवारी डीसीजीआयला स्पुटनिक वी लसीच्या निर्मितीसाठी चाचणी परवाना देण्यासंबंधी अर्ज केल्याची माहिती आहे. रशियाची स्पुटनिक वी लस सध्या भारतात तयार करण्याचे काम डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी करत आहे. दुसरीकडे ’सीरम’ने जून महिन्यात भारत सरकारला कोविशील्ड लसीचे 10 कोटी डोस पुरवणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. बुधवारी रशियाच्या स्पुटनिक वी लसीचे 30 हजार डोस भारतातील हैदराबाद येथे पोहोचले आहेत. ’सीरम’कडून ’नोवावॅक्स’ लसीची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी अमेरिकेच्या परवानगीची आवश्यकता आहे. एप्रिलमध्ये ’डीसीजीआय’ने यासाठी आपत्कालीन परवानगी दिलेली आहे.

भारतीय औषध निर्माती कंपनी ’पॅनेशिया बायोटेक’ने बनवलेली स्पुटनिक वी लसीची पहिली खेप चाचणीसाठी रशियाला रवाना करण्यात आली आहे. रशियात त्या लसीच्या गुणवत्तेची चाचणी करण्यात येणार आहे. स्पुटनिक वी लसीची निर्मिती हिमाचल प्रदेशातील एका कंपनीमध्ये करण्यात आली आहे. गुणवत्ता चाचणी यशस्वी ठरल्यास उत्पादन सुरू करण्यात येणार आहे. रशियाची आरडीआयएफ आणि पॅनेशिया बायोटेक यांच्यासोबत एप्रिलमध्येच स्पुटनिक वी लसीचे उत्पादन करण्याबाबत चर्चा झाली होती. ’पॅनेशिया बायोटेक’ या वर्षाच्या अखेरपर्यंत दहा कोटी लसीचे डोस उपलब्ध होणार आहेत. ’आरआयडीएफ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिमित्रीव यांनी पॅनेशिया बायोटेकच्या साथीने कोरोना प्रतिबंधक लसींचे उत्पादन या महामारीशी लढण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल, असे म्हटले.

Advertisement

MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd IBPS test 4