All News

सर्व विरोधकांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

सर्व विरोधकांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

  • पवार यांची ग्वाही; महाराष्ट्रातील आंदोलक शेतकर्‍यांशी चर्चा

नवी दिल्ली, दि. २९ डिसेंबर : नव्या कृषी कायद्यांना विरोध करणा-या शेतक-यांच्या आंदोलनाचा आज 34 वा दिवस आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतक-यांनी मुक्काम ठोकला आहे. सरकार आणि शेतकर्‍यांमध्ये झालेल्या चर्चेच्या फेर्‍या निष्फळ ठरल्या आहेत. उद्या पुन्हा एकदा सरकार आणि शेतक-यांमध्ये चर्चा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आंदोलक शेतकर्‍यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांची भेट घेतली. पवार यांनी सर्व विरोधक शेतक-यासोबत असल्याचे सांगितले.  


केंद्र सरकारने शेतक-यांच्या मागण्यावर तोडगा काढण्यासाठी पुन्हा एकदा चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. उद्या चर्चेची सातवी फेरी पार पडणार आहे. कायदे मागे घेण्याविषयी आणि स्वामिनाथ आयोगाच्या अहवालावरच चर्चा केली जाईल, असे शेतक-यांनी स्पष्ट केले. उद्या होत असलेल्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील आंदोलक शेतक-यांनी आज पवार यांची दिल्लीत भेट घेतली. या वेळी पवार आणि शेतक-यांमध्ये चर्चा झाली. उद्याच्या बैठकीत जर कोणताही तोडगा निघाला नाही, तर सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावून, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देऊ, अशी हमी पवार यांनी दिल्याचे शेतकरी नेत्यांनी बैठकीनंतर सांगितले. 


नव्या कृषी कायद्यांसह अन्य मुद्यांवर चर्चा करण्याच्या शेतकरी संघटनांच्या प्रस्तावाला प्रतिसाद देत, केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांना बुधवारी दुपारी दोन वाजता बैठकीला बोलावले आहे. केंद्रीय कृषी खात्याचे सचिव संजय अग्रवाल यांनी शेतकरी संघटनांना चर्चेचे निमंत्रण पत्र दिले आहे. शेतकरी संघटनांच्या चर्चा प्रस्तावाच्या अनुषंगाने कृषी सचिव म्हणाले,  की स्पष्ट हेतू आणि मोकळ्या मनाने सर्व संबंधित प्रश्‍नांवर तर्कसंगत तोडगा काढण्यास सरकारही कटिबद्ध आहे. 

Advertisement

test2 Highclonoid Softec Pvt Ltd IBPS test 4