All News

राज्यात कोरोना लसीचा तुटवडा

राज्यात कोरोना लसीचा तुटवडा

मुंबई, दि. ८ एप्रिल : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच आणखी एक संकट राज्यावर चालून आले आहे. राज्यातील विविध लसीकरण केंद्रांवर कोरोनावरील लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. महाराष्ट्रात वेळेत लसीचा पुरवठा न झाल्यास तीन दिवसांत लसीकरण बंद पडण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. 


केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची 11 राज्याच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली. या बैठकीत टोपे यांनी लसीकरणाचा तुटवडयासंदर्भात केंद्राला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. ’सध्या महाराष्ट्रात 14 लाख डोसांचा पुरवठा आहे. हा पुरवठा तीन दिवसांपर्यंतच पुरेल, म्हणून केंद्राकडे आम्ही प्रत्येक आठवड्याला 40 लाख कोरोना लसीचे डोस पुरवण्याची मागणी केली आहे,’ असे टोपे यांनी म्हटले आहे. 


’लसीकरण केंद्रावर पुरेसे लसीचे डोस उपलब्ध नसल्याने अनेकांना पुन्हा परत पाठवण्यात येत आहे. केंद्र सरकार लसीचा पुरवठा करत नाही असे मी म्हणणार नाही; पण त्याचा आणखी वेग वाढवता येईल. तसेच, 20 ते 40 वयोगटातील जनतेला प्राधान्याने लसीकरणाची परवानगी द्यावी,’ अशी मागणी आरोग्यमंत्र्यांनी केंद्राकडे केली आहे. ’ऑक्सिजनचा तुटवडा भासण्याची शक्यता असून आम्हाला जवळच्या राज्यातून ऑक्सिजन पुरवठा केला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. या मागणीची केंद्राने गांभीर्याने नोंद केली आहे. तसेच, ऑक्सिजनचा तुटवडा भासल्यास ऑक्सिजनचा वापर करणार्‍या कंपन्या बंद करण्यात येतील; पण रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासू देणार नाही,’ असे आश्‍वासन टोपे यांनी दिले आहे.


माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्राशी बोलाः फडणवीस

’राज्य सरकार करत असलेला लसीकरणाबाबतचा आरोप चुकीचा आहे. मुळातच आपली लसीकरणाची क्षमता आणि टार्गेट ग्रुपला आवश्यक लसींचा पुरवठा आपल्याकडे नियमित होत असतो. तीन दिवस पुरेल एवढा साठा संपायच्या आत पुढचा साठा येतो. आपल्याला लसींची साठेबाजी करायची नाही,’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. लसीच्या पुरवठ्याबाबत माध्यमांसमोर बोलण्यापेक्षा केंद्र सरकारसोबत चर्चा का करत नाहीत. आपले कुणी जाऊन दिल्लीत किंवा पुरवठादारांकडे जाऊन का बसत नाही, असे सवाल त्यांनी केले.

Advertisement

IBPS Highclonoid Softec Pvt Ltd test2 Highclonoid Softec Pvt Ltd