All News

केंद्राच्या प्रयत्नांबद्दल सर्वोच्च न्यायालय असमाधानी

केंद्राच्या प्रयत्नांबद्दल सर्वोच्च न्यायालय असमाधानी

नवी दिल्ली, दि. २४  मे :  बाधितांची संख्या घटत असली, तरी मृत्यूचे वाढते प्रमाण चिंतेत भर घालत आहे. सर्वोच्च न्यायालयासह देशातील विविध उच्च न्यायालयांमध्ये कोरोनासंदर्भात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. स्थलांतरीत मजुरांच्या मुद्यावर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी तुम्ही करत असलेले प्रयत्न अपुरे असून, आम्ही याबाबत समाधानी नाही, असे न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले.

स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले असून, कामगार नोंदणी योजनेविषयी उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. मजूर, कामगारांची नोंदणी प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरू असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली. तसेच ही प्रक्रिया गतिमान करायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कामगार, मजुरांची नोंदणी प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. ती गतिमान होणे आवश्यक आहे. जेणेकरून स्थलांतरीत मजूर, कामगारांना सरकारी योजनांचा योग्य पद्धतीने आणि प्रमाणात लाभ मिळवता येऊ शकेल; मात्र नोंदणी झाल्याशिवाय योजनांचा लाभ मिळू शकणार नाही. स्थलांतरीत मजूर, कामगारांना सरकारी योजनांचा लाभ कशा प्रकारे मिळेल, याबाबत केंद्र सरकारने निश्‍चित धोरण राबवले पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

असंघटित क्षेत्रातील मजूर, कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेवरून केंद्र तसेच राज्यांचे सुरू असलेले प्रयत्न पुरेसे नाहीत. तुमच्या या कामगिरीवर आम्ही समाधानी नाही, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावले आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना चार लाख रुपयांचे अनुदान देण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर केंद्र सरकारला नोटीस बजावत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.


रुग्णसंख्या घटली, मृत्युसंख्या वाढली

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत दोन लाख 22 हजार 315 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. याच कालावधी देशात तीन लाख दोन हजार 544 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. गेल्या 24 तासांत देशभरात एकूण चार हजार 454 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर आहे. देशात सर्वाधिक रुग्ण तामिळनाडूमध्ये आढळून आले.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam IBPS IBPS