All News

कोरोनामुळे व्यवसायात 25 टक्के् घट

कोरोनामुळे व्यवसायात 25 टक्के् घट

ठाणे, दि. ३ एप्रिल : कोरोना रुग्णांची वाढती संख्या, परिणामी नागरिकांमध्ये असलेले भीतीचे वातावरण तसेच रात्रीची जमावबंदी आदी काही कारणामुळे व्यवसायावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. व्यावसायिक हवालदिल झाले असून शहरामध्ये एकूण व्यवसायामध्ये 20 ते 25 टक्के घट झाल्याचे ठाणे व्यापारोद्योग महासंघाचे अध्यक्ष देवीलाल जैन यांचे म्हणणे आहे. कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहक दुकानांमध्ये येईनासे झाले आहेत, असेही त्यांचे म्हणणे आहे. 


गेल्या वर्षी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासठी कराव्या लागलेल्या टाळेबंदीमुळे व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. अनेकांची दुकाने भाड्याने असल्याने भाड्यासह कर्मचार्‍यांचा पगार, वीजबिल तसेच अन्य खर्च भागवणे व्यावसायिकांना अवघड झाले होते. सर्व कामकाजच ठप्प असल्याने लघुउद्योजकांना टाळेबंदीचा मोठा फटका बसला होता. नंतर टाळेबंदीमध्ये शिथिलता आल्यानंतर उद्योग, व्यवसाय चालू झाले. दुकानेही उघडली. व्यावसायिकांचे सुरुवातीचे काही महिने नुकसानीमध्येच गेले. लोकलही बंद होती. शिवाय अनेकजण घरूनच काम करत असल्याने तसेच कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत नसत. त्यानंतर हळूहळू परिस्थिती बदलली. उद्योग, व्यवसाय सावरू लागले. खरेदीसाठी नागरिक बाजारपेठेमध्ये गर्दी करू लागले. कोरोना नियंत्रणात येत असतानाच मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढू लागले. 


गेल्या वर्षभरापासून करोना आटोक्यात आणण्यासाठी सर्व यंत्रणा दिवसरात्र अथक प्रयत्न करत आहेत, तरीही करोना नियंत्रणात येईनासा झाला आहे. कोरोनाचा कहर वाढू लागल्याने राज्यात रात्री आठनंतर जमावबंदी लागू करण्यात आली. दुसरीकडे वाढत्या करोना रुग्णांच्या संख्येने नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण आहे. या सर्व गोष्टीचा परिणाम व्यवसायावर होऊ लागल्याचे ठाणे व्यापारोद्योग महासंघाचे (ठाम) म्हणणे आहे. नागरिक खरेदीसाठी बाहेर पडेनासे झाले आहेत. रात्री आठनंतर जमावबंदी असली तरी सायंकाळ पाचपासूनच ग्राहक दुकानात खरेदीसाठी येईनासे झाल्याचे ठामचे अध्यक्ष देवीलाल जैन यांचे म्हणणे आहे. त्यामुळे व्यवसायावर खूपच फरक पडला असल्याचे ते सांगतात. व्यावसायिकांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

Advertisement

IBPS test2 MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd