All News

वाझेंच्या अडचणीत वाढ एनआयए कोर्टाने तीनही अर्ज फेटाळले

वाझेंच्या अडचणीत वाढ एनआयए कोर्टाने तीनही अर्ज फेटाळले

मुंबई, दि. १६ मार्च : अँटिलियासमोरील स्फोटकांच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केलेले निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वाझे यांचे तीनही अर्ज एनआयए कोर्टाने फेटाळले आहेत. 


मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीच्या रात्री स्कॉर्पिओ कार पार्क करण्यात आली होती. या कारमध्ये जिलेटिनच्या 19 कांड्या आढळून आल्या होत्या. या कारचा मालक मनसुख हिरेन यांचा काही दिवसांनी अचानक मृत्यू झाला. भाजपच्या नेत्यांनी यात वाझे यांचा हात असल्याचा आरोप केला. त्यानंतर वाझे यांची मुंबई क्राइम ब्रँचमधून बदली करण्यात आली. हा तपास एनआयएकडे सोपवण्यात आल्यानंतर एनआयएने 12 तासांच्या चौकशीनंतर वाझे यांना अटक केली; मात्र त्यांनी आपली अटक बेकायदा असल्याची याचिका एनआयए कोर्टात केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. 


वाझे यांनी एनआयए कोर्टात तीन अर्ज केले होते. एनआयए कार्यालयात सीसीटीव्ही नाही, कोणत्याही सरकारी अधिकार्‍याला सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय अटक करता येत नाही व मूलभूत प्रक्रियेचे पालन न केल्याने अटक कारवाई बेकायदा आहे, असे मुद्दे मांडणारे तीन अर्ज वाझे यांच्यामार्फत एनआयए कोर्टात करण्यात आले होती; मात्र आज सुनावणीअंती विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळले आहेत. दरम्यान, वाझे यांनी वकिलांना भेटू दिले जात नसल्याची तक्रार केली. यावर एनआयए कोर्टाने केवळ चौकशीच्यावेळी वकिलांना दुरून पाहण्याच्या अंतरावर उपस्थित राहण्याची मुभा दिली.

Advertisement

IBPS Highclonoid Softec Pvt Ltd test 4 IBPS