All News

पोलिस अधिकार्‍यांच्या निष्ठा तपासणार

पोलिस अधिकार्‍यांच्या निष्ठा तपासणार

  • गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे संकेत; पोलिस दलांत साफसफाई

मुंबई, दि. ६ एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे पोलिस दलामध्ये लवकरच साफसफाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पदभार स्वीकारताच पोलिस दलातील अधिकार्‍यांच्या निष्ठा तपासण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात पोलिस दलात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


वळसे-पाटील यांनी आज दुपारी गृहमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पोलिस दलात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निष्ठा असलेले अनेक अधिकारी आहेत, त्याबाबत वळसे-पाटील यांना विचारण्यात आले. त्यावर, याबाबत सर्व माहिती घेण्यात येईल. कुणाच्या काय निष्ठा आहेत, त्याची माहिती घेऊ. त्यानंतर जसे आवश्यक असेल तसा निर्णय घेऊ, असे वळसे-पाटील म्हणाले.


पोलिस दलाचे सक्षमीकरण करण्यात येईल. स्वच्छ प्रशासन देण्यावर भर असेल. तसेच प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप करणार नाही. बदल्याच्या संदर्भात प्रत्येक विभागाची जी पद्धत ठरली आहे, वेगवेगळ्या स्तरावर जे अधिकार दिले आहेत. त्यानुसार काम करू असे ते म्हणाले. 


आयपीएस लॉबी सरकारविरोधात काम करत आहे, ते विरोधी पक्षांना माहिती देत आहे, त्यावर काय करणार? असा सवाल करण्यात आला. फडणवीस हे मुख्यमंत्री होते. तसेच गृहखात्याचा पदभार त्यांच्याकडे पाच वर्षे होते. त्यामुळे गृहखात्यातील अधिकारी त्यांच्या संपर्कात असणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच त्यांना माहिती मिळते. त्यातून कसा मार्ग काढायचा आणि कामात सुधारणा कशी होणार, याबाबत विचार केला जाणार आहे, असे ते म्हणाले. 


महिला आणि सामान्य नागरिकांना गृहविभागाकडून बर्‍याच अपेक्षा आहेत. त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यासाठी सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून काम करणार आहे. त्याकरिता आजी, माजी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी चर्चा करून त्यांचा सल्ला घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शक्ती कायदा, पोलिस भरती गतीमान करणे, पोलिसांना घरे देणे या सर्व गोष्टींवर लक्ष देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


गुन्हे निवारण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था

कोण काय आरोप करत आहे, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. माझा पारदर्शक कारभार करण्यावर भर असेल, असे सांगतानाच दैनंदिन दिवसांमध्ये छोटे-मोठे गुन्हे होत असतात. हे गुन्हे निपटून काढण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.


Advertisement

test 4 Highclonoid Softec Pvt Ltd test2 IBPS