All News

शिर्डी विमानतळासाठी तीनशे कोटी

शिर्डी विमानतळासाठी तीनशे कोटी

  • अजित पवार यांची ग्वाही; पंचक्रोशीतील गावांचाही विकास

मुंबई, दि. २८ डिसेंबर :  शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी तसेच देशविदेशांतून येणा-या साईभक्तांच्या दृष्टीने व काकडी व पंचक्रोशीतील गावांचा विकास होण्यासाठी आवश्यक असणारी सुधारित विकासकामे व्हावीत, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शिर्डी विमानतळासाठी तीनशे कोटी रुपये उपलब्ध करून देऊ, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार केली. 


सोमवारी रोजी शिर्डी विमानतळाच्या विविध समस्या व विकासकामांबाबत मुंबई येथे पवार यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या आमदार आशुतोष काळे यांनी शिर्डी विमानतळाच्या विविध समस्यांकडे उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. यामध्ये शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळारून कार्गो सेवा सुरू करण्यासाठी बी. सी. ए. सी. यांच्याकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यास शासनाने शिफारस देवून सल्लागार समिती नेमून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून घ्यावा, कार्गोसेवा व विमानतळ विस्तारीकरणासाठी विमानतळाशेजारील जमीन नवीन भूसंपादन कायद्यानुसार संपादन करून शेतक-यांना त्या जमिनीचा योग्य मोबदला द्यावा, देशविदेशांतून शिर्डी विमानतळावर येणा-या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेवून रात्रीची उड्डाणे सुरू करावीत. रन-वे वरील पाणी नैसर्गिक उताराप्रमाणे काकडी येथील पाझर तलावात सोडण्यासाठी निधी मिळावा, विमानतळाच्या बाहेरील बाजूने सर्विलन्स रोड तयार करण्यात यावेत, शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आय टी कोड सध्या एस. जी. आहे त्यात बदल करून एस आय (साई) करण्यात यावा, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. 


शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामांतर करण्यात यावे, विमानतळासाठी आलेल्या पाण्यातून काकडी, मनेगाव व रांजणगाव या तीन गावांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, काकडी गावातील गावठाणअंतर्गत रस्ते व अंतर्गत गटारीचे तसेच दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे उर्वरित विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना रोजगारांमध्ये प्राधान्य द्यावे, कंत्राटी पद्धतीने कामावर असलेल्या कामगारांना सेवेत कायम करण्यात यावे, काकडी गावातील शेतीसाठी विमान प्राधिकरणाने दिलेल्या आश्वासनांप्रमाणे 24 तास वीज देण्यात यावी,  विमानतळावरील विविध कामांच्या निविदा स्थानिकांना देण्यात याव्यात, महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाने 2016-17 पासून थकवलेली मालमत्ता कराची रक्कम तातडीने भरण्यात यावी, अशा अनेक महत्वाच्या रखडलेल्या समस्या या वेळी काळे यांनी पवार यांच्यापुढे मांडल्या. 


या मागण्यांचा पवार यांनी गांभीर्याने विचार करून महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाने शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्गो सेवा सुरू करणे, रात्रीची उड्डाणे सुरू करणे, विमानतळावरील पाणी काकडी पाझर तलावात वळवणे, विमानतळाच्या बाजूने सर्विलन्स रोड तयार करणे, तसेच प्रकल्पग्रस्त शेतक-यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत काकडी विमानतळासाठी 200 कोटी रुपये निधीची तरतूद करण्याचे आदेश दिले आहेत. त्याव्यतिरिक्त इतर माध्यमातून 100 कोटी रुपये असे एकूण 300 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली.


थकीत मालमत्ता कराबाबत लवकरच निर्णय

काकडी ग्रामपंचायतीच्या थकीत मालमत्ता कराबाबतदेखील लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी सांगितले असल्याची माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांनी दिली आहे.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd IBPS test 4 Highclonoid Softec Pvt Ltd