All News

तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची हत्या संतप्त कार्यकर्त्यांकडून दुकानांची तोडफोड

तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची हत्या संतप्त कार्यकर्त्यांकडून दुकानांची तोडफोड

कोलकाता, दि. ३० डिसेंबर  : आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच राज्यात सातत्याने रक्तरंजित घटना घडत आहेत. बाईकवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी तृणमूल काँग्रेसचे नेते धर्मेंद्र सिंह यांची गोळ्या घालून हत्या केली. सिंह यांच्या मृत्यूची बातमी पसरताच तृणमूल काँग्रेसकडून आक्रोश व्यक्त करण्यात आला.  


तृणमूल समर्थकांनी या घटनेनंतर शिबपूरमध्ये अनेक मोटारसायकली पेटवून दिल्यात. तसेच बस आणि दुकानांची तोडफोडही करण्यात आली. गोंधळाच्या वातावरणामुळे परिसरातील नागरिक धास्तावलेल्या अवस्थेत आहेत. परिसरात पसरलेल्या गोंधळावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अनेक तास मेहनत घ्यावी लागली. या भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. ही घटना पश्‍चिम बंगालमधील हावडा रेल्वे स्टेशनजवळ घडली. पोलिस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंह आपल्या एका ओळखीच्या व्यक्तीसह दुचाकीवरून जात असताना ही घटना घडली. हल्ल्यानंतर सिंह यांना रुग्णालयात नेण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांकडून हल्लेखोरांसोबतच हल्ल्याच्या कारणाचाही शोध घेतला जात आहे. 


हावडा भागातील तृणमूलचे नेते अरुप रॉय यांनी या घटनेमागे मोठे राजकीय षडयंत्र असल्याचे सांगितले. ’धर्मेंद्र सिंह यांच्या डोक्यात गोळ्या घालण्यात आल्या. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. यामागे मोठे षडयंत्र असू शकते,’ असं म्हणतानाच हत्येमागे विरोधकांच्या कट असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या घटनेचा भाजपशी काहीही संबंध नसल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. तृणमूल काँग्रेसच्या अंतर्गत संघर्षाची ही परिणती असू शकते, असा संशय भाजपच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला.

Advertisement

IBPS test 4 Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam