All News

अध्यक्ष होताच जो बायडेन लागले कामाला, ट्रम्प यांचे 'हे' मोठे निर्णय रद्द!

अध्यक्ष होताच जो बायडेन लागले कामाला, ट्रम्प यांचे 'हे' मोठे निर्णय रद्द!

वॉशिंग्टन, दि. २१ जानेवारी :  बुधवारी स्थानिक वेळेनुसार दुपारच्या प्रहरी अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून जोसेफ बायडेन ज्युनियर आणि अमेरिकेच्या ४९व्या उपाध्यक्ष म्हणून कमला देवी हॅरिस यांनी आपापल्या पदांची शपथ घेतली. बायडेन यांनी या शपथविधीनंतर अवघ्या काही तासांमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले अनेक निर्णय रद्द करण्यास सुरुवात केली आहे. 


 बुधवारी अमेरिकेला पॅरिस हवामानबदलविषयक करारामध्ये पुन्हा सहभागी करुन घेण्यासाठी एका कार्यकारी आदेशावर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या कराराच्या माध्यमातून अमेरिका हवामानासंदर्भातील बदलांमुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांना तोंड देणार असून आधी हे आम्ही कधीही केले नसल्याचे बायडेन यांचे म्हणणे होते. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुनही अमेरिका पुन्हा या करारामध्ये सहभागी होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय बायडेन यांनी ट्रम्प यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेले इतरही काही निर्णय रद्द केले आहेत.


आपल्या निवडणूक प्रचाराबरोबरच राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात या निर्णयासंदर्भातील कल्पना बायडेन यांनी दिली होती. ४ लाख अमेरिकन नागरिकांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू, लाखोंवर कोसळलेले बेरोजगारीचे संकट, उद्योगांची झालेली वाताहत, अमेरिकेमध्ये कधीही नव्हता इतका उफाळलेला वंशभेद आणि वर्णभेद अशी निराशाजनक, भीतिदायक परिस्थिती बायडेन-हॅरिस यांच्या आधीच्या प्रशासनाच्या बेफिकीर कारभारामुळे निर्माण झालेली आहे. बायडेन यांनी त्यांच्या संयत परंतु निर्धारपूर्वक भाषणातून या परिस्थितीवर आश्वासक फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीही अमेरिकेने संकटे पाहिली. पण कित्येक संकटे एकाच काळात आलेली नव्हती. अशा वेळी ऐक्य हेच आपले प्रभावी शस्त्र बनू शकते, असे बायडेन म्हणाले.


वातावरण बदलाशी लढण्यासाठी अंतरराष्ट्रीय स्तरावरील पॅरिस हवामानबदलविषयक करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी होणार असल्याची सर्वात महत्वपूर्ण घोषणा करत या करारामधून अमेरिका बाहेर पडत असल्याचा ट्रम्प यांचा निर्णय बायडेन यांनी मागे घेतला आहे.


Advertisement

IBPS Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam test2