तिरूअनंतपूरम, दि १३ जुलै : कोरोनाचे संकट कायम असताना केरळमध्ये गेल्या काही दिवसात झिका विषाणूंचे रुग्ण आढळून येत आहेत. ही संख्या आता १५ वर पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केंद्र सरकारने तज्ज्ञांची एक टीम माहिती घेण्यासाठी पाठवली आहे. या टीममध्ये सहा सदस्य असून परिस्थितीचा आढावा आणि राज्य सरकारला मदत करणार आहे.
केरळमधील १४ जणांचे अहवाल चाचणीसाठी पुण्यातील लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. त्यात सर्व प्रथम एका गरोदर महिलेला झिका विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर इतरांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता. एडीस जातीचे मच्छर चावल्यानंतर झिका व्हायरसची लागण होते. त्या पार्श्वभूमीवर स्वच्छता आणि इतर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.”, असे केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले. हा व्हायरस कोरोनाप्रमाणे जीवघेणा नसल्यामुळे पुरेशी काळजी घेतल्यास त्यावर मात करता येऊ शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यानुसार, डासांच्या चावण्यापासून स्वत:चा बचाव करणे आणि लागण झाल्यास पुरेसा आराम करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
केरळमध्ये सर्वात प्रथम एका गर्भवती महिलेला झिका विषाणूची लागण झाली. महिला ज्या रुग्णालयात उपचार घेत होती, तिथल्याच काही नर्स आणि डॉक्टरांचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवले होते. त्यात ती पॉझिटिव्ह आल्याचं सांगण्यात आले. दरम्यान, या २४ वर्षीय महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या व्हायरसचा गर्भवती महिलांमधून त्यांच्या पोटातील बाळांनादेखील संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांना अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एडीस जातीचा डास चावल्यानंतर झिका व्हायरसची लागण होते. या डासांची निर्मिती चांगल्या पाण्यात होते. या डासामुळे डेंग्यू, चिकनगुनिया आणि पिवळा ताप होण्याचीदेखील शक्यता आहे.
ताप येणे, अंग दुखणे, तसेच अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे हे झिका विषाणूची प्राथमिक लक्षणे आहेत. या दरम्यान प्रचंड डोकेदुखी होते. डोळे लाल होणे, अशक्तपणा आणि थकवादेखील जाणवतो. ही लक्षणे दोन ते सात दिवसापर्यंत कायम राहतात. सुरुवातीला आलेल्या तापावरून झिका विषाणूची लागण झाल्याचे सांगणे कठीण आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करून निदान करणे आवश्यक आहे. डास चावण्यापासू संरक्षण करणे हाच सर्वांत मोठा उपाय आहे. संशयित रुग्णांची वेळेवर चाचणी करणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, गर्भवती महिलांना झिकाचा सर्वाधिक धोका असतो. याचा परिणाम न जन्मलेल्या मुलावरही होऊ शकतो. एखाद्या संक्रमित पेशंटने लैंगिक संबंध ठेवले, तर निरोगी व्यक्तीलाही झिका होतो. 2007 मध्ये प्रशांत महासागरातील याप बेटावर प्रथम झिका विषाणूची साथीची घटना घडली. त्यानंतर, ब्राझील, अमेरिका आणि आशियामध्येदेखील या रोगाची साथ पसरली. या रोगामुळे मानवांमध्ये अर्धांगवायू आणि मृत्यू होऊ शकतो. नवजात मुलामध्ये मायक्रोसेफली आणि इतर जन्मजात रोग होऊ शकतो. याला जन्मजात झिका सिंड्रोम म्हणतात. यामुळे गर्भवती महिलांच्या गरोदरपणातील गुंतागुंत वाढते आणि गर्भपात होण्याचा धोकाही वाढतो. ब्राझीलमधील २०१४ च्या साथीच्या रोगामुळे मृत्यूचा धोका कित्येक पटीने वाढण्याची शक्यता आहे. संक्रमित महिलांमध्ये जन्मलेली मुले मायक्रोसेफली विकसित करू शकतात. अशा परिस्थितीत मुलाचे डोके लहान होते. काही रूग्णांमध्ये नेत्रविकार होतात. जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे, की झिकाने संक्रमित रूग्णांसाठी कोणतेही अचूक उपचार किंवा लस विकसित झालेली नाही.
Copyright © 2023 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.