अलिबाग, दि. २० मे : मी पंढरपूरच्या जनतेला शब्द दिला होता, या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करेल. मी माझ्या विधानावर ठाम आहे; पण आता सध्या ही वेळ नाही. आपण कोरोनाशी लढत आहोत. आम्हाला कोरोनाशी लढायचे आहे, या सरकारशी लढायचे नाही. ज्या दिवशी कोरोनाचा काळ संपेल, तेव्हा मी माझा शब्द खरा करून दाखवेल’, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी फडणवीस कोकणच्या दौर्यावर आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ’रश्मी शुक्ला यांचा जो अहवाल आहे, तो जर बाहेर आला, तर या सरकारला तोंड दाखवण्यासाठी जागा उरणार नाही. त्यामुळे हे सरकार न्यायालयात गेले आहे आणि चौकशी करू नये, अशी विनंती करत आहे. हे सरकार त्यांच्याच अंतर्विरोधामुळे पडेल हे मी आधीच सांगितले होते. आता त्याची वेळ जवळ येत आहे. त्याकडे वाटचाल आता सरकारची सुरू झाली आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.
’पंढरपूर पोटनिवडणुकीमध्ये अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस उतरली, संपूर्ण प्रशासनाचा गैरवापर करण्यात आला; पण जनतेने आमच्या उमेदवाराला निवडणूक दिले, असे सांगून ते म्हणाले, की ’तौक्ते चक्रीवादळामुळे सर्वदूर नुकसान झाले नाही; पण काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. तिथे मदत करण्याची गरज आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी राज्य सरकारने जी मदत जाहीर केली होती, ती या वेळी अद्यापही दिली नाही. कोल्हापूर, सातार्यात महापूर आला होता, त्या वेळी आम्ही तातडीने मदत दिली होती. मी स्वत: जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर मदतीची घोषणा केली. मदतीची घोषणा करण्याआधी माहिती घेऊन घोषणा करण्याची गरज आहे, असेही फडणवीस म्हणाले.
’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदतीची घोषणा केली आहे. त्याबरोबर ज्या राज्यात नुकसान झाले आहे, त्यांचासुद्धा उल्लेख केला आहे. तामिळनाडूने याबद्दल कोणतीही मागणी केली नाही. गोव्यानेही तशी कोणतीही मागणी केली नाही. फक्त महाराष्ट्रातच काही नेते हे स्क्रिप्ट ठरल्याप्रमाणे केंद्रावर आरोप करत आहे. केंद्राने हे दिले नाही, ते दिले नाही. जाणीवपूर्वक ते कांगावा करत आहे. त्यांना माहिती असूनसुद्धा ते मुद्दामहून दररोज खोट बोलून रेटून बोला, अशी टीका त्यांनी केली. ’कोरोनाच्या काळात केंद्राने सर्वात जास्त मदत महाराष्ट्राला दिली आहे; पण केंद्राने काही मदत दिली नाही, असा गळा काढण्याचे काम सरकारने केले. सर्वांत जास्त दोन कोटी लसी राज्याला देण्यात आल्या. त्या बळावर सर्वांत जास्त लसीकरण राज्यात झाले. मग, त्या लसी काय जमिनीतून आल्या होत्या का, असा सवाल करत फडणवीस यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला.
Copyright © 2023 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.