All News

आगामी पाच वर्षात भारताला ऑटोमोबाईल उत्पादनाचे केंद्र बनविण्यासाठी सरकार कार्यरत - नितीन गडकरी

आगामी पाच वर्षात भारताला ऑटोमोबाईल उत्पादनाचे केंद्र बनविण्यासाठी सरकार कार्यरत - नितीन गडकरी

नवी दिल्ली, दि. २३ नोव्हेंबर : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितले की, ‘‘भारतातल्या स्वयंचलित उद्योग व्यवसायाला एकत्रित करून या क्षेत्रात जागतिक दर्जाच्या मूलभूत क्षमता निर्माण करण्याचे लक्ष्य सरकारने निश्चित केले आहे. देशात विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या वापराला गती देण्यासाठी एक संपूर्ण परिसंस्था तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.’’ नितीन गडकरी आज ‘इलेक्ट्रिक मोबिलिटी परिषद-2020- सिझिंग अपॉरचुनिटीज’ या विषयावर आयोजित एका आभासी परिषदेमध्ये बोलत होते. प्रदूषण कमी करण्यासाठी भारताचा एक राष्ट्रीय व्यापक कार्यक्रम आहे, त्यासाठी स्वयंचलित वाहन उद्योगांनी एकत्रित यावे, असे आवाहन यावेळी नितीन गडकरी यांनी केले.


इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्यावतीने अनेक पावले उचलण्यात येत आहेत, असे सांगून गडकरी म्हणाले, या वाहनांवर असलेल्या वस्तू आणि सेवा करामध्ये 5टक्के कपात करण्यात आली आहे. तसेच दुचाकी आणि तिनचाकी वाहनांना लागणाऱ्या बॅटरीची किंमतही जवळपास 30 टक्के कमी करण्यात आली आहे. या वाहनांसाठी बॅटरी चार्जिंगची सुविधा असणे गरजेचे आहे, त्याचे महत्व लक्षात घेऊन सरकारने देशभरातल्या जवळपास 69 हजार पेट्रोल पंपांवर किमान एक चार्जिंग सुविधा केंद्र उभे करण्यासाठी परिसंस्था तयार करण्याची योजना आखत आहे.


आगामी पाच वर्षात स्वयंचलित वाहन उत्पादनामध्ये भारत वैश्विक केंद्र बनावे, यासाठीही सरकार कार्यरत असल्याचे महामार्ग मंत्री गडकरी यांनी सांगितले. भारताला वाहन उद्योग निर्मितीमध्ये जगात अव्वल बनविण्याचे माझे स्वप्न आहे, त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांच्या व्हिजनअनुसार आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी या क्षेत्राचेही योगदान असणार आहे.


भारत वाहन निर्मितीचे जागतिक केंद्र बनविण्यासाठी आपल्या ऑटो उद्योगाला काही महत्वपूर्ण बदल करताना नवीन संकल्पनांचा विकास केला पाहिजे. यामध्ये वेगवेगळ्या डिझाईनचे मॉडेल तयार करून संशोधन आणि विकास यावर अधिक भर दिला पाहिजे. या क्षेत्राला असलेली मोठी बाजारपेठ, स्थिर सरकार, भक्कम कार्य आराखडा आणि उज्ज्वल, प्रतिभावंत युवा अभियंते यांच्या जोरावर आपण अव्वल बनू शकतो, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. वास्तविक सध्याही भारतामध्ये सर्वाधिक दुचाकी वाहनांची निर्मिती होते, असेही त्यांनी सांगितले.


स्वयंचलित वाहन क्षेत्रामध्ये असलेल्या अमर्याद संभावना लक्षात घेऊन सरकारने या क्षेत्रामध्ये उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन (पीएलआय) देण्यासाठी 51,000 कोटींची तरतूद केली आहे. अशा 10 क्षेत्रांपैकी ही सर्वाधिक तरतूद वाहन उद्योगासाठी केली आहे, असे सांगून गडकरी म्हणाले, स्वयंचलित वाहन निर्मिती क्षेत्राला जवळपास 25 दशलक्ष कुशल कामगारांची आवश्यकता नजीकच्या काळात असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रोजगार निर्मिती आणि वृद्धी या क्षेत्रामध्ये होणार आहे.


स्वयंचलित वाहन उद्योगाला पेट्रोल किंवा इथेनॉल अथवा सीएनजी यांचा इंधन म्हणून वापर करणे परवडणारे ठरणार आहे. ब्राझिल आणि अमेरिका या देशांचे उदाहरण भारतीय वाहन उद्योग क्षेत्राने घेतले पाहिजे, असे सांगून गडकरी म्हणाले, सीएनजी, हायड्रोजन, वीज यासारख्या प्रदूषणमुक्त इंधनाचा वापर करण्याची आवश्यकता आहे.


दिल्ली आणि मुंबई या द्रुतगती महामार्गावर ई-महामार्ग बनविण्याच्या दिशेने सरकार कार्य करीत असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. वाहतुकीच्या साधनांची गरज लक्षात घेऊन ऑटा उद्योगाने डबल डेकर बसेस सह विविध प्रकारची वाहने बनविण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

Advertisement

test 4 test2 Highclonoid Softec Pvt Ltd IBPS