All News

पुण्यात सायंकाळी पाचनंतर संचारबंदी

पुण्यात सायंकाळी पाचनंतर संचारबंदी

पुणे, दि. 27 जून : डेल्टा, डेल्टा प्लससारख्या व्हेरिएंटमुळे कोरोनाचा धोका वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने जुन्या नियमावलीमध्ये बदल केल्यानंतर पुणे महापालिकेनंही सुधारीत आदेश काढले आहेत. त्यानुसार, पुण्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली असून पाच वाजल्यानंतर संचारबंदी असेल. संचारबंदीच्या काळात पुणेकरांना केवळ अत्यावश्यक कारणासाठी घराबाहेर पडता येणार आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे वाटत असताना राज्यात कोरोनाच्या विषाणूचे नवे प्रकार समोर आले आहेत. रत्नागिरी, जळगावसह काही जिल्ह्यांत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळले असून कालच राज्यात डेल्टा प्लस बाधित रुग्णाचा पहिला मृत्यू झाला. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने शुक्रवारी नवे आदेश जारी केले. यापूर्वी टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याचा निर्णय घेताना राज्य सरकारने पाच स्तर जाहीर केले होते. पहिल्या स्तरावर असलेल्या जिल्ह्यांतील लॉकडाऊन संपूर्ण उठवण्यात आला होता, तर दुसर्‍या स्तरावर असलेल्या जिल्ह्यांमध्ये बर्‍यापैकी मोकळीक देण्यात आली होती; मात्र नव्या आदेशानुसार आता सर्व जिल्हे तिसर्‍या स्तराच्या वर असतील असे जाहीर करण्यात आले आहे. हे नवे स्तर विचारात घेऊन अनेक जिल्ह्यांत व महापालिका क्षेत्रात सुधारीत आदेश काढले जात आहेत.

पुणे महापालिकेने निर्बंध कठोर करत महापालिका क्षेत्रात जमावबंदी लागू केली आहे. त्यानुसार पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. सायंकाळी पाचनंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात अत्यावश्यक कारणाशिवाय कोणालाही बाहेर पडता येणार नाही. सरकारने ठरवून दिलेल्या निकषांनुसार, ठराविक कालावधीने आढावा घेऊन निर्बंध कमी जास्त केले जातील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd test 4 Highclonoid Softec Pvt Ltd IBPS